ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध रॉक स्टार आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक जेम्स (फारूक महफूज अनम) याच्या संगीत कार्यक्रमात भीषण हिंसाचार झाला आहे. फरीदपूर जिल्हा शाळेच्या १८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मैफिलीवर जमावाने विटा आणि दगडांनी हल्ला केला. या गोंधळात १५ ते २० विद्यार्थ्यांसह किमान २५ जण जखमी झाले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला.
टोकियो : नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच जपानमध्ये एका भीषण अपघाताने शोककळा पसरली आहे. जपानमधील एका मुख्य महामार्गावर खराब हवामान आणि ...
नेमकं काय घडलं?
फरीदपूर जिल्हा शाळेच्या दोन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री ९ वाजता जेम्सचा परफॉर्मन्स होणार होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती आणि प्रेक्षक जेम्सची वाट पाहत होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच काही 'बाहेरच्या' लोकांनी विनापरवाना आत शिरण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी त्यांना रोखल्यामुळे संतापलेल्या या जमावाने थेट मंचाच्या (Stage) दिशेने विटा आणि दगड भिरकावण्यास सुरुवात केली.
विद्यार्थी रक्ताळले, आयोजकही चक्रावले
जमावाच्या या हल्ल्याला विद्यार्थ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या चकमकीत १५ ते २० विद्यार्थी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून फरीदपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रात्री १० वाजता हा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. "आम्ही सर्व तयारी केली होती, पण हा हल्ला कोणी आणि का केला हे समजू शकलेले नाही," असे प्रसिद्धी समितीचे प्रमुख राजीबुल हसन खान यांनी सांगितले.
तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली चिंता
या घटनेवर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी चिंता व्यक्त करत बांगलादेशातील सांस्कृतिक अधोगतीवर भाष्य केले आहे. त्यांनी ट्विटरवर (X) लिहिले की, "मैहर घराण्याचे कलाकार सिराज अली खान ढाका येथे आले होते, पण कार्यक्रमापूर्वीच तोडफोड झाल्याने ते न सादरीकरण करताच भारतात परतले. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कलाकार आणि सांस्कृतिक संस्था सुरक्षित नाहीत, तोपर्यंत ते बांगलादेशात पाय ठेवणार नाहीत." तसेच उस्ताद रशीद खान यांचा मुलगा अरमान खान यानेही सुरक्षेच्या कारणास्तव ढाका येथील आमंत्रण नाकारले आहे. नसरीन यांनी पुढे असेही नमूद केले की, बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी जाणीव जोपासणारे 'छायानौत' (Chhayanaut) हे सांस्कृतिक केंद्रही जाळण्यात आले आहे. संगीत, नाटक आणि लोककलेचा प्रचार करणाऱ्या संस्थांवर होणारे हे हल्ले देशातील कट्टरतावादाचे दर्शन घडवत आहेत.
कोण आहे गायक 'जेम्स'?
'नगर बाऊल' या रॉक बँडचा मुख्य गायक जेम्स हा बांगलादेशातील संगीताचा आयकॉन मानला जातो. भारतात त्याला 'गँगस्टर' चित्रपटातील "भीगी भीगी" या सुपरहिट गाण्यामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. त्याच्याच कार्यक्रमावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने जगभरातील संगीत प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.