Saturday, December 27, 2025

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांना फोन जाण्यास सुरुवात - काही ठिकाणी जागांची अदलाबदली; बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून विशेष खबरदारी

मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांना फोन जाण्यास सुरुवात - काही ठिकाणी जागांची अदलाबदली; बंडखोरी टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेकडून विशेष खबरदारी

मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने, महायुतीच्या नेत्यांनी मुंबईसाठी नावे अंतिम झालेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ‘ए+’ आणि ‘ए’ श्रेणीतील प्रभागांतील भाजप उमेदवारांना अर्ज भरण्याच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तर शिवसेनेनेही नावे अंतिम झालेल्या उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत. बंडखोरीचा धोका टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी विशेष खबरदारी घेतली असून, काही ठिकाणी जागांची किंवा उमेदवारांची अदलाबदल करण्यात येणार आहे.

मुंबईतील २२७ प्रभागांचे भाजपने मतदारांच्या कलानुसार ‘ए+’, ‘ए’, ‘बी+’, ‘बी’ आणि ‘सी’ असे वर्गीकरण केले आहे. ‘ए+’ श्रेणीतील प्रभाग हे १०० टक्के विजयाची खात्री असलेले असून, येथे बंडखोरी झाली तरी फारसा फरक पडणार नाही. ‘ए’ श्रेणीतील प्रभाग घरोघरी प्रचार आणि परिवार संस्थांच्या मदतीने जिंकता येतील, अशी खात्री आहे. ‘बी+’ मध्ये चांगला उमेदवार आणि संघटनात्मक ताकद दिल्यास विजय शक्य आहे, तर ‘बी’ आणि ‘सी’ श्रेणीतील जागा अधिक कठीण मानल्या गेल्या आहेत. ‘बी+’, ‘बी’ आणि ‘सी’ श्रेणीतील जागांसाठी परिवार संस्था आणि भाजपच्या अंतर्गत टीमच्या सर्व्हेनुसार उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, बंडखोरीची शक्यता लक्षात घेऊन संभाव्य बंडखोरांवर नजर ठेवली जात आहे. नाव अंतिम झालेल्या उमेदवारांना थेट फोन न करता अप्रत्यक्ष मार्गाने तयारीच्या सूचना देण्यात येत आहेत. ज्यांना फोन गेले आहेत, त्यांना २१ पानांचा अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी राहू नयेत यासाठी वकील किंवा सीएकडून तपासणी करण्याची ताकीद देण्यात आली आहे.

बंडखोरी शमवण्यासाठी विशेष फौज

भाजपने बंडखोरी शमवण्याची जबाबदारी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय उपाध्याय, गोपाळ शेट्टी यांच्यासह जिल्हास्तरीय नेत्यांवर सोपवली आहे. दादर, वरळी, माहीम, परळ, शिवडीसारखे मराठीबहुल प्रभाग तसेच अंधेरी, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगावसारखे भाजपचे बालेकिल्ले शिवसेनेनेही मागितले आहेत. त्यामुळे जागावाटपात तिढा निर्माण झाला असून, जागांची अदलाबदल आणि उमेदवारांची देवाणघेवाण करून तो सोडवला जात आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी प्रभाग ७६ आणि ८१ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु, विधानसभेत पटेल यांना शिवसेनेकडू उमेदवारी मिळाली आणि ते जिंकले देखील. त्यामुळे शिवसेनेने हे प्रभाग आपल्याला सोडण्याचा आग्रह धरला. मात्र, भाजपने त्यास नकार दिल्याने जागावाटप अंतिम होत नव्हते. अखेर माजी नगरसेविका केशरबेन पटेल यांना शिवसेनेत घेऊन जागांची अदलाबदल करण्याचे ठरले.

याशिवाय प्रभाग ४, ९, ४१, ६४, ६५ १५७ आणि १५८ मध्ये उमेदवारांची अदलाबदल होणार आहे. जागा कोणत्याही पक्षाला गेली, तरी उमेदवार पराभूत होऊ नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही असाच तिढा उमेदवार अदलाबदलीने सोडवला गेला होता.

२१२ जागांवर एकमत

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत २१२ जागांवर एकमत झाले असून, उर्वरित १५ जागांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून, भाजप सुमारे १४० आणि शिवसेनेला ८७ जागा सुटण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा