धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. हा नवरात्र उत्सव २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. याचदरम्यान, नाताळ तसेच नववर्ष, असा तिहेरी योग साधून देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. नाताळपासून गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने मंदिर प्रशासनाने काही बदल केले आहेत. यात प्रामुख्याने २०० रुपयांचे सामान्य दर्शन पासेस तसेच याच किमतीत उपलब्ध होणारे रेफरल पेड दर्शन पासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना लवकर व सुलभतेने दर्शन होऊ शकेल. सोबतच दर्शन सुलभतेसाठी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर धर्मदर्शन व मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्गे दर्शनमंडपात सोडण्यात येणार असल्याचेही मंदिर प्रशासनाने कळवले आहे.
शाकंभरी नवरात्र महोत्सव कालावधीत रेफरल पासेस बंद केले असले तरी ५०० रुपयांचे स्पेशल देणगी दर्शन पासेस मात्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासकीय कार्यालयाच्या तळ मजल्यातून हे पासेस वितरित होतील. या पासधारक भाविकांना तसेच सिंहासन/अभिषेक पूजा पासधारकांना राजे शहाजी महाद्वारातूनच मंदिरात सोडले जाणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.