महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही


महाड निवडणूक चित्र


संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. राज्यात महायुतीत असणारे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही घटक पक्ष मैत्री पूर्ण लढत लढले. गेली अनेक वर्षे शिवसेनेचा पारंपरिक मित्र असलेल्या भारतीय जनता पार्टीने यावेळी आपली नैसर्गिक मैत्री तोडत राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या मित्राला साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस अशी लढत झाली. या लढतीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सुनील कविस्कर यांचा विजय होऊन महाड पालिकेवर २५ वर्षांनी भगवा फडकला. शिवसेनेचे ८ नगरसेवक विजयी झाले, तर एक दोन उमेदवारांचा निसटता पराभव झाला.


महाड विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून येऊनही भरतशेठ गोगावले यांना महाड नगर परिषद ताब्यात घेता आली नव्हती. मात्र महाड मतदारसंघातून आमदारकीचा चौकार मारून भरतशेठ गोगावले यांनी इतिहास रचला आणि त्या पाठोपाठ या वेळच्या नगर परिषद निवडणुकीत महाड पालिकेवर भगवा फडकवून गेल्या २५ वर्षाचा वनवास संपवून नवा इतिहास घडवला.


दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आपल्या नव्या मित्राच्या साथीने महाड नगर परिषदेत आपले खाते खोलून गेल्या अनेक वर्षांत जे जमले नाही ते करून दाखवत इतिहास घडवला. यामध्ये भाजपचे नेते नामदार प्रवीण दरेकर यांनी घेतलेल्या प्रचार सभांचा मोठा वाटा आणि कार्यकर्त्यांची मेहनत होती. भाजपचे दोन नगरसेवक पालिकेमध्ये निर्वाचित झाले आहेत. यामध्ये एका नवख्या व सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवाराने शिवसेनेच्या एका मातब्बर नेत्याचा केलेला पराभव हा सर्वांनाच अचंबित करणारा ठरला. काँग्रेसचे नेते माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांच्या पश्चात होणारी महाड नगर परिषदेची ही पहिलीच निवडणुक होती.


आमदारकीची निवडणूक सलग तीन वेळा पराभूत झाल्यानंतरही माणिकरावांनी शिवसेनेला महाडमध्ये शिरकाव करून दिला नव्हता. त्यामुळे महाड विधानसभेत पराभूत झाल्यानंतर माणिकराव यांची कन्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या पुढे महाड नगर परिषदेमध्ये आपले प्राबल्य राखण्याचे मोठे आव्हान होते. त्यांच्या मदतीला यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे व भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कलमकर जरी पराभूत झाले तरी युतीने सर्वाधिक १२ जागा जिंकून पालिकेतील आपले वर्चस्व कायम राखला. युतीच्या एक दोन जागा काही फरकाने गेल्या.


महाड नगर परिषदेच्या खऱ्या अर्थाने वेगळ्या ठरलेल्या या निवडणुकीत इतिहास कोण रचणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. मात्र सुज्ञ असलेल्या महाडकर मतदारांनी इतिहास रचण्याचा आनंद कुणा एकाला न देता ती संधी स्पर्धेत असलेल्या तिघांना देऊन समान न्याय केला. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांची हार जीत झाली असली तरी फटाके फोडण्याची व गुलाल उधळण्याची संधी महाडकरांनी सर्वांना दिली.महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मैत्रीपुर्ण लढत लढलेले हे तीनही पक्ष पालिकेच्या सभागृहात महाडच्या सर्वांगिण विकासासाठी हातात हात घालून काम करणार का याची उत्सुकता आता महाडकरांना असणार आहे.

Comments
Add Comment

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात,

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी