फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही
महाड निवडणूक चित्र
संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी ठरली. राज्यात महायुतीत असणारे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही घटक पक्ष मैत्री पूर्ण लढत लढले. गेली अनेक वर्षे शिवसेनेचा पारंपरिक मित्र असलेल्या भारतीय जनता पार्टीने यावेळी आपली नैसर्गिक मैत्री तोडत राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या मित्राला साथ दिली. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट, भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस अशी लढत झाली. या लढतीमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या सुनील कविस्कर यांचा विजय होऊन महाड पालिकेवर २५ वर्षांनी भगवा फडकला. शिवसेनेचे ८ नगरसेवक विजयी झाले, तर एक दोन उमेदवारांचा निसटता पराभव झाला.
महाड विधानसभा मतदारसंघात तीन वेळा निवडून येऊनही भरतशेठ गोगावले यांना महाड नगर परिषद ताब्यात घेता आली नव्हती. मात्र महाड मतदारसंघातून आमदारकीचा चौकार मारून भरतशेठ गोगावले यांनी इतिहास रचला आणि त्या पाठोपाठ या वेळच्या नगर परिषद निवडणुकीत महाड पालिकेवर भगवा फडकवून गेल्या २५ वर्षाचा वनवास संपवून नवा इतिहास घडवला.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आपल्या नव्या मित्राच्या साथीने महाड नगर परिषदेत आपले खाते खोलून गेल्या अनेक वर्षांत जे जमले नाही ते करून दाखवत इतिहास घडवला. यामध्ये भाजपचे नेते नामदार प्रवीण दरेकर यांनी घेतलेल्या प्रचार सभांचा मोठा वाटा आणि कार्यकर्त्यांची मेहनत होती. भाजपचे दोन नगरसेवक पालिकेमध्ये निर्वाचित झाले आहेत. यामध्ये एका नवख्या व सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवाराने शिवसेनेच्या एका मातब्बर नेत्याचा केलेला पराभव हा सर्वांनाच अचंबित करणारा ठरला. काँग्रेसचे नेते माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांच्या पश्चात होणारी महाड नगर परिषदेची ही पहिलीच निवडणुक होती.
आमदारकीची निवडणूक सलग तीन वेळा पराभूत झाल्यानंतरही माणिकरावांनी शिवसेनेला महाडमध्ये शिरकाव करून दिला नव्हता. त्यामुळे महाड विधानसभेत पराभूत झाल्यानंतर माणिकराव यांची कन्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या पुढे महाड नगर परिषदेमध्ये आपले प्राबल्य राखण्याचे मोठे आव्हान होते. त्यांच्या मदतीला यावेळी रायगडचे खासदार सुनील तटकरे व भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी भाजप युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदेश कलमकर जरी पराभूत झाले तरी युतीने सर्वाधिक १२ जागा जिंकून पालिकेतील आपले वर्चस्व कायम राखला. युतीच्या एक दोन जागा काही फरकाने गेल्या.
महाड नगर परिषदेच्या खऱ्या अर्थाने वेगळ्या ठरलेल्या या निवडणुकीत इतिहास कोण रचणार याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. मात्र सुज्ञ असलेल्या महाडकर मतदारांनी इतिहास रचण्याचा आनंद कुणा एकाला न देता ती संधी स्पर्धेत असलेल्या तिघांना देऊन समान न्याय केला. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांची हार जीत झाली असली तरी फटाके फोडण्याची व गुलाल उधळण्याची संधी महाडकरांनी सर्वांना दिली.महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मैत्रीपुर्ण लढत लढलेले हे तीनही पक्ष पालिकेच्या सभागृहात महाडच्या सर्वांगिण विकासासाठी हातात हात घालून काम करणार का याची उत्सुकता आता महाडकरांना असणार आहे.