भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा
विरार : महानगरपालिकेच्या सत्तेसाठी बहुजन विकास आघाडीतून (बविआ) भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने भाजपमधील एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्तेसाठी पक्षात येणाऱ्यांना तात्काळ उमेदवारी देऊ नये, अशी स्पष्ट मागणी करत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी थेट पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपने वसई–विरार महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला असून, त्यासाठी बविआमधील नाराज नेते व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा सपाटा सुरू आहे. मात्र, बविआतून आलेल्यांना थेट तिकीट देण्याची चर्चा सुरू होताच, पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
सत्तेसाठी पक्षात प्रवेश घेणाऱ्यांना तात्काळ उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर धुरी, उत्तमकुमार, नवघर–माणिकपूर शहराध्यक्ष महेश सरवणकर यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी या पत्रातून स्पष्ट भूमिका मांडली आहे. पक्षात नव्याने आलेल्यांना लगेच तिकीट दिल्यास अनेक इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात संबंधित नेत्यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. बविआत ज्यांना महत्त्व नव्हते, अशा लोकांना भाजपमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याच भूमिकेतून कार्यकर्त्यांनी सह्यांची मोहीम राबवत बविआतून आलेल्यांना तिकीट देऊ नये, असे निवेदन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.