मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री जागरण करुन नववर्षाचा जल्लोष केला जातो. मुंबईतील सर्व समुद्र किनारे, हॉटेल, पर्यटनस्थळे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांना मध्यरात्री पण आरामात घरी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील हजारो नागरिक दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बॅण्ड स्टॅण्ड येथे जातात. तसेच हजारो नागरिक १ जानेवारीच्या सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेच घर सोडून प्रभादेवीच्या दिशेने प्रवास करतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता कल्याण येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. याच पद्धतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री पनवेल येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व विशेष लोकल मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील.