श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी ८.५४ वाजता 'LVM3-M6' या भारताच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटद्वारे अमेरिकेचा 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा उपग्रह अवकाशात सोडला गेला आहे. हा उपग्रह केवळ एक यंत्र नसून मोबाईल तंत्रज्ञानातील मोठी क्रांती आहे. कारण ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक दळणवळण उपग्रह आहे.
ब्लूबर्ड ब्लॉक-२ मिशन हे ग्लोबल LEO कॉन्स्टेलेशनचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सॅटेलाइटद्वारे थेट मोबाइल फोनवर कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. यामुळे 4G आणि 5G व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग आणि डेटा सेवा जगाच्या कोणत्याही भागात उपलब्ध करून दिल्या जातील. कोणत्याही स्मार्टफोनद्वारे अंतराळातून थेट कॉल करता येईल. मात्र, सध्या विमानात बसून कॉल करता येत नाही, कारण याचा नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम होतो. इस्रोच्या मते, हे मिशन एक समर्पित व्यावसायिक प्रक्षेपण आहे, जे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि अमेरिकेच्या स्पेसमोबाइल कंपनीद्वारे करण्यात आले आहे.
प्रक्षेपणापूर्वी, इस्रोने सांगितले की, LVM3 रॉकेटद्वारे हा उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवला जाणारा असून हा आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड असेल. यापूर्वी, सर्वात जड पेलोड चार हजार चारशे किलोग्रामचा होता. जो नोव्हेंबर २०२४ मध्ये जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ४३.५ मीटर उंचीचे LVM3 रॉकेट तीन टप्प्यांचे आहे. ज्यात क्रायोजेनिक इंजिन वापरले आहे. रॉकेटला लिफ्ट-ऑफसाठी दोन S200 सॉलिड बूस्टर थ्रस्ट देतात. प्रक्षेपणाच्या सुमारे १५ मिनिटांनंतर उपग्रह रॉकेटपासून वेगळा होण्याची अपेक्षा आहे.