नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील सत्तासमीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची कमान हाती घेतल्यापासून गणेश नाईक आणि शिंदे यांच्यात सुप्त संघर्ष सुरू झाला. नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या जनता दरबारांनी या संघर्षाला व्यापक वळण मिळाले. मात्र, अचानक या दोन्ही नेत्यांनी मंत्रालयात बंद दाराआड चर्चा केल्याने त्यांचे मनोमिलन झाले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
“सोन्याची अंडी खाऊन झाली आता कोंबडीच कापायला निघाले" “आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा” मुंबई : काही लोक मुंबईकडे सोन्याची अंडी ...
नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी येथे आपली राजकीय पकड मजबूत ठेवली आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत ठाण्यापलिकडे जात नवी मुंबईतही संघटनात्मक जाळे विणण्याचा प्रयत्न सुरू केल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये संषर्घ सुरू झाला. प्रभाग रचना, विकासकामे, नगरसेवक फोडणे अशा अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दुसरे म्हणजे, मंत्रीपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार सुरू केला. शिंदे यांच्या प्रभावक्षेत्रात नाईकांनी जनता दरबार घेतल्याने, त्याकडे थेट आव्हान म्हणून पाहिले गेले. विशेषतः नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद तीव्र झाला होता.
अशात शिंदे आणि नाईक यांच्यात मंत्रालयात बंददाराआड १५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याने, ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. नवी मुंबई पालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने महायुती म्हणून लढवावी, यावर दोन्ही नेत्यांचे बैठकीत एकमत झाल्याचे कळते. शिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला देखील अंतिम झाला असून, ठाणे आणि पालघरमधील अन्य पालिकांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.






