समाजकार्य हेच ईश्वरकार्य

कर्तृत्ववान ती राज्ञी : उज्वला करंबळेकर


“समाज हा आपलाच आहे, त्याच्या भल्यासाठी केलेले कार्य हेच खरे ईश्वरकार्य" या दृढ विश्वासाने आयुष्यभर समाजकार्य करणाऱ्या व विविध सामाजिक संस्था, संघटनांमध्ये जबाबदारीच्या पदांवर सक्रिय असतानाही स्वतःतील कार्यकर्तेपण जपणाऱ्या उज्ज्वलाताई करंबळेकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.


ठाण्यातील फडके कुटुंबात जन्मलेल्या उज्ज्वला ताईच्या जडणघडणीत कुटुंबसंस्कारांचा मोठा वाटा आहे. मीतभाषी, वाचनवेडी, कर्मठपणापासून दूर असलेल्या आईने दिलेले स्वातंत्र्य आणि विश्वास त्यांच्या आयुष्याचा कणा ठरले•, तर मोठ्या भावाकडून विज्ञाननिष्ठ, तर्काधिष्ठित विचारांची देणगी मिळाली. याच संस्कारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता आणि वैचारिक स्पष्टता रुजवली.


शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धा,उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत बीएससी, स्टॅटिस्टिक्स D.B.M., ही शैक्षणिक वाटचाल त्यांनी पूर्ण केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून सोशल वर्क, योग विद्यानिकेतन इथून योग शिक्षक प्रशिक्षण, योग थेरपी, नॅचरोपॅथी याचे देखील त्यांनी शिक्षण घेतले•.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका बैठकीने त्यांच्या आयुष्याला समाजकार्याची दिशा दिली. शाळेपासूनच स्वयंसेवी वृत्ती अंगी भिनलेली होती. विद्यार्थी भांडार, खेळांची जबाबदारी, नवरात्रोत्सवातील स्वयंसेवकगिरी या साऱ्या अनुभवांनी कार्यकर्तेपणाची पायाभरणी केली.


१९८० मध्ये स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर विद्यार्थी परिषदेचे काम त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. ठाणे पूर्वेतील पारशीवाडी येथील संस्कार केंद्र, महाविद्यालयीन काम, वस्तीपातळीवरील उपक्रम या सगळ्यात स्वतःला झोकून दिले. पुस्तक पेढीची जबाबदारी मिळाल्याने परिषदेच्या कार्यालयाशी रोजचा संबंध आला, ज्येष्ठ समाजसेवक वसंतराव पटवर्धन यांचे घर त्यांच्या कार्यकर्तेपणाचे साक्षीदार ठरले. ते केवळ घर नव्हते, तर संस्कारांचे विद्यापीठ होते असे उज्ज्वला ताई अभिमानाने सांगतात.


संघटनात्मक काम करताना आत्मविश्वास आणि नेमकेपणा याचे महत्त्व त्यांना विस्तारक योजनेतून उमगले. घरोघरी जाऊन परिषदकार्य समजावून सांगताना माणसांशी जोडले जाण्याची कला त्यांनी आत्मसात केली. प्रदेश अभ्यासवर्ग, अधिवेशने यांमुळे व्यापक विश्व उलगडत गेले. एक छोटी शाखा ते अखिल भारतीय पातळीपर्यंतची एकसूत्रता त्यांच्या कार्याला गती देणारी ठरली.


१९८२ मधील आंतरराज्य छात्रजीवन दर्शन या प्रकल्पाने त्यांच्या मनावर खोल ठसा उमटवला. ईशान्य भारतातील समाजजीवन जवळून पाहताना ‘विविधतेत एकता’ ही संकल्पना प्रत्यक्ष अनुभवली. मात्र सीमाभागातील असुरक्षितता पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. समाज व राष्ट्र सक्षम होण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे हा विचार अधिक दृढ झाला व प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही जागृती करण्याचे त्यांनी ठरवले.


मुंबईत अ.भा.वि.प.चे पूर्णवेळ काम करताना वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या कृतीतून साधेपणा, शिस्त, माणूसपण यांचे संस्कार त्यांना मिळाले. याच काळात मा. हशू अडवाणी यांचा सहवास लाभला. त्यांचे समाजाशी एकरूप झालेले जीवन, कार्य तत्परता आणि साधेपणा उज्ज्वला ताईंच्या कार्यकर्तेपणाला नवी उंची देणारा ठरला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व साप्ताहिक विवेकचे संपादक दिलीप करंबळेकर व उज्ज्वला ताई यांनी विवाह अत्यंत साधेपणाने करून त्यांनी समाजासमोर कृतिशील आदर्श ठेवला. 'सुखाच्या कल्पना' ज्याच्याशी जुळतात असा सहचर लाभल्याने त्यांच्या कार्याला अधिक गती मिळाली. पुढे 'चेंबूर विद्या समितीत' महिलांच्या स्वावलंबनासाठी काम करताना परिषदेतील अनुभवांची शिदोरी प्रत्येक क्षणी त्यांना उपयोगी ठरली.


२००३ पासून त्यांच्याकडे 'जनकल्याण सहकारी बँकेच्या संचालक पदाची धुरा आली. बँकेत लघुउद्योजिका महिलांसाठी 'उद्योगिनी' ही योजना, महिलांसाठीचे स्वतंत्र बचत खाते-जनकल्याणी, १२ ते १८ वयोगटातील किशोरांसाठी स्वतंत्र Jananext खाते अशा विविध योजना त्यांनी सुरू केल्या.


'योग विद्या निकेतन' ह्या गुरुवर्य सदाशिव निंबाळकरांच्या संस्थेत गेली १६ वर्षे त्या योगशिक्षकांना प्रशिक्षण देत आहेत.


२०१५ ते २०२० शुश्रूषा सिटीझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, दादर मध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी हॉस्पिटलच्या सेवा रुग्णकेंद्री असाव्या, ना की डॉक्टरकेंद्री ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. 'सुख-शांती' ह्या १८ वर्षांच्या वरील अडचणीत सापडलेल्या मुली , महिला ह्यांचेकरिता मानखुर्द येथे आधारगृह आहे. या संस्थेत त्या गेली १२ वर्षे विविध पदांवर कार्यरत आहेत. योग विद्या निकेतनच्या योगशिक्षिका, तसेच जनकल्याण बँकेत कार्य विस्तारांच्या योजनांमधील प्रमुख भूमिका बजावत असताना, आंतरराष्ट्रीय योग दिन गेली ५ वर्षे जनकल्याण सहकारी बँकेत एकाच वेळेस २६ शाखांमध्ये उज्ज्वलाताईंच्या मार्गदर्शनाखाली 'योग ॲट वर्क प्लेस' अशा अभिनव उपक्रमाद्वारे साजरा केला जात आहे .


महिलांमधील शक्तीला समन्वित करण्यासाठी २०१५ पासून विविध संस्था संघटनातील महिलांचे संघटन करून त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. तसेच 'कमला गोविंद तहिलीयानी' वुमन्स पॉलिटेक्निक फॉर व्होकेशनल कोर्सेस' ह्या एनजीओमध्ये वीस वर्षे सातत्याने व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन महिलांना सक्षम केले आहे. आत्मविश्वास दिला आहे. महिलांनी आत्मविश्वासातून - आत्मनिर्भरतेकडे आणि आत्मनिर्भरतेकडून - अर्थनिर्भरतेकडे भक्कम वाटचाल करावी, ह्या उद्देशाने 'जनकल्याणी' ह्या विशेष बचत खात्याची सुरुवात बँकेत केली.


योग क्षेत्रात त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत, योग विद्या निकेतनच्या 'योग जीवन गौरव' पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. कार्यकर्तेपणाचा प्रवास केवळ एकट्याचा कधीच नसतो तर तो संस्कारांनी घडलेल्या अनेक आयुष्यांचा आरसा असतो त्यामुळे कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता आपण सातत्याने कार्य करत राहिल्यास आपल्या हातून आपोआपच उत्तम समाजकार्य घडते असे मनोगत त्या व्यक्त करतात.


२१ व्या शतकात पालकत्व आव्हानात्मक आहे. नैतिक मूल्य, संस्कार नुसते सांगून नाही, तर व्यवहार, कृती ह्यांमधून रुजतात. दैनंदिन जीवनातील स्वयंशिस्त, नेमस्तपणा, सद्सद्विवेक, सारासार विचार आणि काळाचं भान येणाऱ्या पिढीत रुजवायला हवं आणि आयुष्यात फक्त पैसा महत्त्वाचा नसून आपल्या पॅशनचा उपयोग समाजाकरिता करण्याने मिळणारे आत्मिक समाधान मोठे आहे हे त्यांच्या मनांवर बिंबवायला हवे. असा मोलाचा सल्ला उज्ज्वलाताई सगळ्यांना देतात. भविष्यकालीन योजनेमध्ये त्यांच्या कार्याचा वटवृक्ष हा असाच बहरत राहणार आहे. •कोकण प्रांत महिला समन्वय संयोजिका या भूमिकेतूनही त्यांचे कार्य अविरत चालू राहणार आहे. विद्यार्थ्यांना योग शिकवता शिकवता अनेक नवीन गोष्टी शिकवायच्या आहेत. राहून गेलेल्या गोष्टींमध्ये लेखन आणि गायनाची त्यांची आवड जोपासण्याचा त्यांचा मानस आहे.


उज्ज्वला ताईंचे कार्य हे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनुभव समृद्ध करत जाते. त्यांचा सतत उंचावर जाणारा समाजकार्याचा आलेख त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित करणारा व सगळ्यांसाठीच अनुकरणीय असा आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील स्वतःतील कार्यकर्तेपणाची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या या मार्गदर्शक संस्थेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!

Comments
Add Comment

योग व्हावी जीवनशैली

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके जीवनशैली म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. जगण्याची ही पद्धत आपल्या आयुष्याचा अविभाज्य

करडईची भाजी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे डिसेंबरची थंडी म्हणजे फक्त हवामानातला बदल नाही; ती आठवणींची चाहूल असते. सकाळी

नैसर्गिक प्रसूती

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील नैसर्गिक प्रसूती म्हणजे कोणतीही शस्त्रक्रिया न करता योनीमार्गातून बाळ जन्माला

नाताळ स्पेशल नखांना द्या ख्रिसमस टच!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर "जिंगल बेल्सच्या तालावर आणि थंडीच्या शिरशिरीत नाताळचं स्वागत करायला तुम्ही सज्ज

करतात काय रात्रीच्या वेळी मुली Google वर सर्च ; धक्कादायक अहवालाने तुम्हीही हादराल

या गोष्टी मुली रात्रीच्या वेळी गुगलवर सर्च करताना दिसत असल्याचं ही समोर आलं आहे. मुंबई : 'गुगल ईयर इन सर्च २०२५

सतत स्क्रीनचा वापर करून डोळे थकले असतील तर न चुकता खा हे आठ पदार्थ, चष्म्याचा नंबरही होईल आपोआप कमी

मुंबई : बदललेल्या जीवनशैलीत लॅपटॉप, मोबाईल यांसारख्या स्क्रीनसमोर तासन्‌तास काम करणे महत्वाचे झाले आहे. याचा