चंद्रपूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची किडनी विकल्याच्या गाजलेल्या प्रकरणात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या अवैध किडनी तस्करी रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘डॉ. कृष्णा’ला सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी प्रत्यक्षात डॉक्टर नसून बनावट ओळखीच्या आधारे अनेकांना फसवत होता, अशी धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ‘डॉ. कृष्णा’ म्हणून वावरणारा आरोपी मल्लेश नावाचा अभियंता आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याने सुरुवातीला स्वतःची किडनी विकली होती. त्यानंतर त्याने एजंट म्हणून काम सुरू करत कर्जबाजारी आणि गरजू लोकांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली.
याच आरोपीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुडे याला जाळ्यात ओढून आधी कोलकात्याला, त्यानंतर कंबोडियाला पाठवले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्याची किडनी काढण्यात आली. या बदल्यात रोशन कुडे याला केवळ आठ लाख रुपये देण्यात आले, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
या अटकेनंतर किडनी तस्करीचे जाळे राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटचे बळी ठरलेल्यांची संख्या मोठी असू शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चंद्रपूर पोलीस आता आरोपी मल्लेशची सखोल चौकशी करत असून, या आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या इतर एजंट्स, डॉक्टर आणि रुग्णालयांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणाचा उगम रोशन कुडे यांच्या तक्रारीतून झाला होता. २०२१ मध्ये त्यांनी दोन सावकारांकडून ५० हजार रुपयांचे कर्ज ४० टक्के व्याजदराने घेतले होते. काही काळातच सावकारांनी व्याजासह ही रक्कम ७४ लाख रुपये झाल्याचा दावा करत दबाव वाढवला. कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता.
या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, यापूर्वी सहा सावकारांना अटक करण्यात आली आहे. आता किडनी तस्करी रॅकेटविरोधात कारवाई अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.