नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर
महाड : रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित, खा. सुनील तटकरे व भरत गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील कविस्कर हे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपद जरी शिवसेनेकडे गेले असले तरी राष्ट्रवादी भाजप युतीने नगरसेवक पदाच्या १२ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखले आहे. भाजपने प्रथमच महाड पालिकेत २ जागा जिंकून आपले खाते खोलले आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले महाविकास आघाडीचे चेतन पोटफोडे हे तिसऱ्या क्रमांकावर राहीले. महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या इतिहासात सुनील कविस्कर यांच्या रूपाने शिवसेनेचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे. शिवसेनेचे सुनील कविस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांचा पराभव केला. नगराध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे चेतन पोटफोडे यांना ५०४ मते तर अपक्ष उमेदवार गणेश कारंजकर यांना ३०१ मते मिळाली. प्रभाग क्र. १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजित साळी व वैशाली रक्ते, प्रभाग २ मधून राष्ट्रवादीचे महेश शेडगे व शिवसेनेच्या पालवी गोळे, प्रभाग ३ मधून शिवसेनेचे प्रमोद महाडीक व राष्ट्रवादीच्या गितांजली महाडीक,प्रभाग ४ मधून राष्ट्रवादीचे हेमंत चांदलेकर व शिवसेनेच्या गायत्री कविस्कर, प्रभाग ५ मधून राष्ट्रवादीचे वजीर कोंडीवकर व हवा पानसरी, प्रभाग क्र ६ मधून भाजपचे सुरज बामणे व शिवसेनेच्या विद्या देसाई, प्रभाग ७ मधून राष्ट्रवादीचे संदीप जाधव व शिवसेनेच्या पुजा गोविळकर, प्रभाग ८ मधून राष्ट्रवादीच्या अक्षया हेलेकर व भाजपचे सुमित पवार, प्रभाग ९ मधून शिवसेनेचे निखिल शिंदे व राष्ट्रवादीच्या दिक्षा शिंदे, प्रभाग १० मधून शिवसेनेचे दीपक चव्हाण व मिनल जाधव हे विजयी झाले. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १०, शिवसेनेने ८ व भाजपने २ जागा जिंकल्या. महाड नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी येणाऱ्या काळात महाडमध्ये विकासाची गंगा आणू असे सांगितले.घरपट्टी मध्ये ५० टक्के सूट देण्याच्या प्रश्नावर पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असेही स्पष्ट केले. राष्ट्रवादी च्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी भाजप युतीच्या १२ नगरसेवकांना विजयी करीत जे बहुमत दिले त्याबद्दल मतदारांचे आभार मानत महाडचा सर्वांगीण विकास हा अजेंडा घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सांगितले.