चंद्रकांत चौधरी नगराध्यक्ष पदावर विजयी
माथेरान : सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या माथेरान नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने शहरात आनंद उत्सव सुरू झाला. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना प्रत्येक टप्प्यात चुरस जाणवत होती. एकूण मतदान ३४४५ इतके पार पडले. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत चौधरी यांना २२५७ मते मिळाली. १०६९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपद पटकावले. प्रतिस्पर्धी शिवराष्ट्र पॅनेलचे उमेदवार अजय सावंत यांना ११८८ मते मिळाली. यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण ही निवडणूक शिवसेना-भाजप युतीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली होती. दुसरीकडे सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांनी शिवराष्ट्र पॅनल उभे करून मोठे राजकीय आव्हान उभे केले होते.
या दोन्ही पॅनेलमध्ये चुरस पाहायला मिळाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले होते. तथापि, निकालाने सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत शिवसेना–भाजप युतीने नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. प्रभागवार ताकद आजमावत शिंदे गट व भाजपच्या उमेदवारांनी बहुतेक जागांवर बाजी मारत स्पष्ट वर्चस्व निर्माण केले.