मुंबई : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा संघ फक्त १५६ धावांवर आटोपला. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासह अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा राडा झाल्याचे समोर आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे अध्यक्ष मोहसीन नक्वीचा भारतीय संघाकडून पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे. अंडर-१९ आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी नक्वीकडून पदके स्वीकारण्यास नकार दिला. मोहसीन नक्वी यांनी वैयक्तिकरीत्या पाकिस्तान संघाला अंडर-१९ आशिया कप ट्रॉफी सादर दिली.
मोहसीन नक्वी अंतिम सामन्यादरम्यान सादरीकरण समारंभात भाग घेण्यासाठी दुबईला पोहोचले होते. मोहसीन नक्वीने पहिली जेतेपद पटकावणाऱ्या पाकिस्तान संघाच्या खेळाडूंना पदके दिली. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफच्या हातात ट्रॉफी दिली. भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वीकडे दुर्लक्ष केले.