हिंगोली : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यभरात भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले असून शिंदे गटाची शिवसेना ५७, अजित पवार गट ३८, काँग्रेस ३०, ठाकरे गट १०, शरद पवार गट १० तर इतर पक्षांचे २३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
या निकालांमध्ये हिंगोली जिल्ह्यात महिलांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपरिषदांमध्ये महिला नगराध्यक्ष निवडून आल्या असून महाविकास आघाडीला या तिन्ही ठिकाणी एकही जागा राखता आलेली नाही.
हिंगोली नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या रेखा बांगर यांनी २३ हजार ७९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या शिवसेना उबाठा उमेदवाराला केवळ ३ हजार ३८४ मतांवर समाधान मानावं लागलं.
वसमत नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनीता बाहेती यांनी २० हजार १६५ मते मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं. काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांना १६ हजार ७१४ मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वसमत नगरपरिषदेत महाविकास आघाडीचे केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने आघाडीला मोठा फटका बसल्याचं चित्र आहे.
कळमनुरी नगरपरिषदेतही शिंदे गटाच्या शिवसेनेचा वरचष्मा राहिला. नगराध्यक्षपदासाठी आश्लेषा चौधरी यांनी ५ हजार ६३५ मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार २८८ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील या निकालांनी महिलांचं नेतृत्व आणि महायुतीचं वर्चस्व स्पष्ट केलं असून महाविकास आघाडीसाठी हा निकाल मोठा इशारा मानला जात आहे.