पोलादपूर : तालुक्यातील ओंबळी गावात आपत्ती निवारा शेडच्या कामाचा भूमिपूजन व शुभारंभ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, उद्योजक रामदास कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ओंबळीतील मुंबई, पुणे व ठाणे येथील चाकरमानी मंडळी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आपत्ती निवारा शेडमुळे ओंबळी गावासह परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अतिवृष्टीच्या काळात व संभाव्य दुर्घटनांच्या वेळी नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा, या उद्देशाने ही महत्त्वाची सुविधा उभारण्यात येत आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपये अंदाजित खर्च होणार आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांचे जिवित तसेच मालमत्तेची हानी टाळण्यासाठी अशा निवारा शेडची नितांत गरज असून, हा प्रकल्प आपत्तीकाळात लोकहितासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.