मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या आधी सरकारने अग्निवीरांना एक मोठी भेट दिली आहे. एवढेच नाहीतर लवकरच इतर केंद्रीय पोलीस दलांनाही असाच कोटा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यानंतर भविष्याबद्दल चिंताग्रस्त असलेल्या ७५ टक्के अग्निवीरांना हा मोठा दिलासा आहे.
सीमा सुरक्षा दलाने माजी अग्निवीरांसाठी पद आरक्षण वाढवले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठीचा कोटा १० टक्क्यांवरून ५० टक्के केला आहे. अधिसूचनेत, गृह मंत्रालयाने बीएसएफ जनरल ड्यूटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा केली आहे. १८ ते २३ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमधील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि त्यानंतरच्या बॅचमधील उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाणार आहे. नियमांनुसार, प्रत्येक भरती वर्षात सीमा सुरक्षा दलामधील ५० टक्के रिक्त पदे माजी अग्निवीरांसाठी, १० टक्के माजी सैनिकांसाठी आणि वार्षिक रिक्त पदांपैकी ३ टक्क्यांपर्यंत थेट भरतीसाठी राखीव असतील. पहिल्या टप्प्यात, नोडल फोर्स माजी अग्निवीरांसाठी राखीव असलेल्या ५० टक्के रिक्त पदांसाठी भरती करेल. दुसऱ्या टप्प्यात, स्टाफ सिलेक्शन कमिशन उर्वरित ४७ टक्के (ज्यामध्ये १० टक्के माजी सैनिकांचा समावेश आहे) माजी अग्निवीरांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी भरती करेल.