कोकणी बाणा : सतीश पाटणकर
तगडा अभिनय, जबरदस्त संवादफेक, समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना पाटेकर. गेल्या ४० वर्षांपासून केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणारा हा कलावंत. चार दशकांच्या कारकिर्दीत आपल्या नियम व अटींवर दिलखुलास जगणारा, लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारा स्पष्टवक्ता आणि येईल त्या प्रसंगांना तेवढ्याच तडफेने सामोरे जाणारा मनस्वी कलावंत म्हणजेच नाना पाटेकर.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे नाना यांचा सिनेसृष्टीतील आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रवास सरळ नव्हता. नाना पाटेकर हे केवळ अभिनेते किंवा नट नाहीत तर ते नटसम्राट आहेत. नानांचं खरं नाव आहे विश्वनाथ. रायगडमधल्या मुरुड-जंजिरा इथल्या एका गावात १ जानेवारी १९५१ रोजी नाना पाटेकर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचं नाव दिनकर पाटेकर, तर आईचं नाव संजनाबाई पाटेकर. नानांचे वडील हे चित्रकार होते. त्यामुळं नानांना देखील कला क्षेत्राशी आवड निर्माण झाली होती. पण काही कारणांमुळं कुटुंबावर आर्थिक संकटं येत गेली. कमी वयात नानांनी घराची जबाबदारी उचलली होती. वयाच्या अवध्या १३ व्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयीन दिवसांमध्ये नाना नाटकांत काम करायचे.
नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात छबिलदास प्रायोगिक रंगभूमीवरून सुरू केली. त्यावेळी त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या गवराई या नाटकामध्ये केलेली भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. यानंतर त्यांनी अनेक नाटकं, सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ नावाची संस्था उभी केली असून त्याद्वारे ते दुष्काळ पीडित आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करतात.
१९७८ मध्ये आलेल्या ‘गमन’ सिनेमातून नानांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर नानांनी अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं, पण ‘अंकुश’ सिनेमांतून त्यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली. ‘गिड्ड’, ‘प्रहार’, ‘प्रतिघात’ या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अंकुश, सलाम बॉम्बे, परिंदा, प्रहार, राजू बन गया जंटलमन, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, खामोशी, वजूद, पुरुष, टॅक्सी क्रमांक ९२११, राजनीती, अब तक छप्पन, गोलमाल अगेन अशा अनेक चित्रपटांनी नाना गाजले. हिंदीच्या तुलनेत त्यांनी मराठी सिनेमा कमी केले. पण त्यांच्या मोजक्या भूमिकाच हिट ठरल्या. भालू, पक पक पकाक, देऊळ, नटसम्राट, आपला माणूस या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिकांचं कौतुक झालं. नानांनी आपल्या करिअरमध्ये साइड हिरो, हिरो, खलनायक इतकेच काय कॉमेडी भूमिकाही तेवढ्याच ताकदीने केल्या. नानांनी एखादी गोष्ट ठरवली की ती यशस्वीपणे पार पाडल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. रायफल शूटिंगबाबत हे म्हणावे लागेल. पन्नाशीनंतर त्यांना रायफल शूटिंगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. ते केवळ रायफल शूटिंग शिकले नाही तर त्यात त्यांनी नैपुण्य मिळवले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केली.
आज असे अनेक डॉयलॉग्ज आहेत, केवळ त्यांचा उच्चार जरी झाला तरी नानांचा चेहरा समोर येतो. अनेक डॉयलॉग्जला तर त्यांनी अमरत्व प्रदान केले आहे. चित्रपटांच्या जाहिराती चिकटवणारा ते चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या कलाकाराचा हा प्रवास तेवढ्याच चढउताराचा राहिला. आपल्या हरहुन्नरी अभिनयानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेले अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर हे बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नाव आहे. नानांचा चाहता वर्गही मोठा आहे. सिनेसृष्टीत त्यांच्या सगळ्यांनाच आदरयु्क्त भीती वाटते. ना हिरोचा चेहरा, ना सिनेसृष्टीत कोण गॉडफादर, केवळ मेहनत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर नाना पाटेकरांनी आपलं यशस्वी असं करिअर उभं केलंय. गंभीर भूमिका असो किंवा कॉमेडी... नानांनी त्या भूमिकेला १०० टक्के न्याय दिलाय. त्यांचा अभिनय, त्यांचा आवाज ही त्यांची जमेची बाजू. नानांच्या वडिलांना नाटकांची मोठी आवड होती. त्यांनीच नानांना नाटके पाहायची सवय लावली आणि त्यातूनच आजचे नाना पाटेकर घडले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांनी आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केले. प्रख्यात दिग्दर्शिका विजया मेहता यांच्याकडे त्यांनी पहिले नाटक केले. १९७८ ‘गमन’मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर पुढील काही वर्षे मिळेल ती कामे केली. १९८६ मध्ये एन चंद्राच्या अंकुशमधील बेकारीमुळे त्रस्त युवकाची जबरदस्त भूमिका त्यांनी केली. १९८९ मधील परिंदामधील त्यांच्या खलनायकाची दखल संपूर्ण सिनेसृष्टीला घ्यावी लागली. मग नंतर नानांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या संवाद फेकीमुळे त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नानांनी आपल्या करिअरमध्ये अनेक एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमा केले आहेत. त्यांचे अपवाद वगळता सर्वच सिनेमे चांगले आहेत. प्रत्येक चित्रपटात वेगळे नाना पाहायला मिळतात.
आपल्या दानशूरपणासाठीही ते प्रसिद्ध आहेत. बिहारमध्ये पुराचा फटका बसलेल्या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी त्यांनी अनुभूती चॅरिटेबलच्या माध्यमातून देणगी दिलेली आहे. विविध पुरस्कारांसाठी मिळालेली रक्कम त्यांनी मदतीसाठी वापरलेली आहे. नानांना त्यांच्या सिनेसृष्टीतील भरीव योगदानासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराचे विजेते ठरले. मनोरंजन सिनेसृष्टीसह समाजातील त्यांच्या बहुमोल योगदानासाठी २०२१ चा गदिमा पुरस्कार मिळाला आहे. तसंच २०१३ मध्ये त्यांचा ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला आहे. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.