मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान
मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या मर्यादित न राहता, त्या प्रत्यक्षात उतरून समाजासाठी शाश्वत उपयोगी ठराव्यात, असा धडा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी घालून दिला आहे. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत मोखाडा तालुक्याचे गटविकास अधिकारी अक्षय पगारे यांनी चक्क मजुरांच्या सोबतीने मातीत राबत कारेगाव येथे वनराई बंधारा बांधला. अधिकाऱ्याचा हा 'ग्राऊंड रिॲलिटी' अवतार पाहून जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
पालघर जिल्ह्यात जलसंधारणाला चालना देण्यासाठी सीईओ मनोज रानडे यांनी सर्व विभाग प्रमुख, बचत गट आणि कर्मचाऱ्यांना वनराई बंधारे बांधण्यासाठी लोकसहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन केवळ औपचारिक न ठेवता, अक्षय पगारे यांनी कारेगाव ग्रामपंचायतीमधील वनराई बंधाऱ्याच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी केवळ पाहणी करून किंवा फोटो काढून काम सोडले नाही. प्रत्यक्ष खोदकाम करणे, गोण्यांमध्ये माती भरणे आणि ती माती पाठीवरून वाहून बंधाऱ्याच्या भरावासाठी वापरणे, अशी कष्टाची सर्व कामे त्यांनी मजुरांच्या बरोबरीने केली. बंधाऱ्याचे काम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत पगारे स्वतः तेथे राबत होते. साधारणपणे मोठे सरकारी अधिकारी अशा कामांच्या ठिकाणी केवळ फीत कापण्यासाठी किंवा पाहणीसाठी जातात. मात्र, एक क्लास वन अधिकारी अशा प्रकारे मजुरांच्यात मिसळून काम करतो, हे जिल्ह्यासाठी अत्यंत आशादायी चित्र आहे. यामुळे केवळ ग्रामसेवक, सरपंच किंवा ग्रामस्थच नव्हे, तर इतर सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थीही या मोहिमेत उत्साहाने सामील होत आहेत. यावेळी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील पाटील सरपंच मुरलीधर कडू, उपसरपंच मिलिंद बदादे, सदस्य हनुमंत फसाळे देविदास ठोमरे, ग्रामपंचायत अधिकारी एस आर धुरंधर, कृषी सहाय्यक मिटकरी, नरेगा विभागाच्या स्वप्नाली दोंदे, शुभम मोरे, अविरत दोंदे, विजय ठोमरे गोपाळ ठोमरे, हरी ठोमरे कारेगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार
"वनराई बंधारे हे केवळ सोपस्कार न राहता ते वास्तववादी जलसाठा निर्माण करणारे असावेत, जेणेकरून जिल्ह्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करता येईल," असे मत सीईओ मनोज रानडे यांनी व्यक्त केले आहे. मोखाडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सध्या अशाच प्रकारे वनराई बंधारे उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे.