अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांसाठी रविवारी (२१ डिसेंबर) मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, २८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी ८३ टेबल लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी ३४, तर २०७ नगरसेवक पदांसाठी उमेदवार ५७५ निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगर परिषदांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यांनतर सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या कक्षात मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रविवारी मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, तसेच मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मतमोजणी प्रक्रिया होणार १० राऊंडमध्ये
श्रीवर्धन : रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मत मोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार व पत्रकारांसाठी माहिती पर बैठक उपविभागीय कार्यालय, श्रीवर्धन येथील सभागृहात पार पडली. ही बैठक तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत प्रशासनाकडून मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार स. ९ वा. उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्राँगरूम उघडण्यात येणार असून, त्यानंतर स.१० वा. मतमोजणीस प्रारंभ होईल. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया १० राऊंडमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक उमेदवाराला प्रतिनिधी नेमण्याची मुभा देण्यात येणार असून, ईव्हीएम मशीन टेबलवर असतानाच कोणतीही शंका किंवा आक्षेप उपस्थित करणे आवश्यक राहील. एकदा मशीन स्ट्राँग रूममध्ये गेल्यानंतर कोणतीही शंका विचारता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मतमोजणी दरम्यान प्रत्येक प्रभागासाठी एक स्वतंत्र टेबल ठेवण्यात येणार असून,ओळखपत्रशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. पत्रकारांनाही मतमोजणी प्रक्रियेबाबत आवश्यक नियम व सूचना देण्यात आल्या. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पडावी, असे आवाहन तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी केले आहे.
दहा ठिकाणी होणार मतमोजणी
नगर परिषद मतमोजणी टेबल संख्या मतमोजणी अधिकारी, कर्मचारी संख्या
अलिबाग १० ३०
मुरुड-जंजिरा ०५ १८
उरण १० ३३
पेण १३ ३९
कर्जत १० ३६
माथेरान ०१ ६
खोपोली १० ३०
रोहा ०४ ३६
श्रीवर्धन १० ३०
महाड १० ३०
एकूण ८३ २८८