नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तानमधून एक धक्कादायक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जाफर एक्सप्रेस या ट्रेनवर पुन्हा हल्ला करण्यात आला. या आधीही या ट्रेनवर मार्चमध्ये हल्ला करण्यात आला होता .त्या हल्ल्यात ४०० प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते . या वर्षी जाफर एक्सप्रेस आणि बोलन मेलवर अनेक वेळा हल्ला झाला आहे. संशयित दहशतवाद्यांनी जाफर एक्सप्रेससह दोन ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला.
बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी रेल्वे ट्रॅकवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. तसेच रॉकेट्सने ट्रेन उडवण्याचा प्रयत्नही केला. या हल्ल्यापासून जाफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली. हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जाफर एक्सप्रेसवर हल्ला होण्याचा २०२५ मधील हा आठवा प्रयत्न आहे. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. हल्यामुळे रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुशकाफमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे तीन फूट रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले, तर दश्त परिसरात झालेल्या दुसऱ्या स्फोटात अधिक नुकसान झाले. दोन्ही घटनांमध्ये जाफर एक्सप्रेस आणि बोलन मेल पॅसेंजर गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. स्फोटांमुळे मुख्य रेल्वे मार्गावरील ट्रॅकचे नुकसान झाले. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. आता क्वेट्टाहून पाकिस्तानच्या इतर प्रांतांमध्ये जाणाऱ्या प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यापूर्वी सुरक्षा मंजुरी घेणे सक्तीचे केले आहे.