उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ धाममधील यंदाचा हिवाळा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. डिसेंबर महिना अर्धा संपूनही बाबा केदारची नगरी अद्याप बर्फाविना दिसत असल्याने भाविकांसह वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरवर्षी या काळात केदारनाथ परिसरात पाच फुटांहून अधिक बर्फ साचलेला असतो, मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे असून निसर्गाचं चक्रच जणू उलटं फिरल्याचं जाणवत आहे.
हवामानातील बदलाचा थेट परिणाम केदारनाथवर होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. केदारनाथमध्ये शेवटची बर्फवृष्टी २० नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर डिसेंबरचा तिसरा आठवडा सुरू होऊनही आजूबाजूच्या पर्वतशिखरांवर बर्फाचा लवलेशही दिसत नाही. यामुळे परिसरात कोरडी पण तीव्र थंडी अनुभवायला मिळत आहे.
या कोरड्या थंडीमुळे केदारनाथमध्ये रात्रीचे तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात आहे. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडतो, मात्र दुपारनंतर लगेचच वातावरणात पुन्हा कडाक्याची थंडी पसरते. परिणामी धाममध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर मर्यादा येत असून सुमारे १५० मजूर दिवसाला फक्त ५ ते ६ तासच काम करू शकत आहेत.
दरम्यान, २०१३ साली झालेल्या भीषण आपत्तीनंतर चौराबाडी येथून वाहून आलेले प्रचंड दगड आता केदारपुरीच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ज्या दगडांनी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला होता, त्याच दगडांवर आता सुंदर कलाकृती साकारल्या जात आहेत. धाममधील दगडांवर मंदिर, गोमाता, भगवान गणेश, शंकर, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा कोरल्या जात आहेत. यासोबतच ऋषीमुनी, विविध आसनांमधील देवी-देवतांच्या मुद्रा, पाच पांडव तसेच पशु-पक्ष्यांच्या कलाकृतीही साकारण्यात आल्या आहेत. या सर्व कामांमुळे केदारपुरीचा परिसर पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि आकर्षक दिसणार आहे.