बेंगळुरू : पाणीपुरी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. या पाणीपुरीसाठी एक दुकानदाराचा जीव गेला आहे. फुकटात पाणी पुरी न दिल्याने पाणीपुरीचा ठेला चालवणाऱ्या मालकावर थेट चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत दुकानदाराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सदर घटना ही कर्नाटकातील बंगळुरूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १० ते १०.३० च्या सुमारास बेंगळुरूतील बटरायनपुरा मुख्य रस्त्यावर एक पाणी पुरीवाला आपला ठेला घेऊन उभा होता. यादरम्यान त्याच्या ठेल्याजवळ एक दारूच्या नशेत तरुण आला. त्याने पाणी पुरीवाल्याकडे फुकटात पाणीपुरी मागितली. मात्र दुकानदाराने त्याला फुकटात देण्यास मनाई केली. दुकानदाराने विकतची पाणी पुरी खायला सांगितल्याने तरुण संतापला. या गोष्टीवर आरोपी भडकला आणि दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. वादाच्या दरम्यान आरोपीने अचानक चाकू काढला आणि दुकानदाराच्या पोटात चाकूने वार केला. चाकू लागताच दुकानदार तिथेच रक्तबंबाळ होऊन कोसळला, तर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. स्थानिक लोकांनी ताबडतोब जखमी दुकानदाराला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले आणि पोलिसांना माहिती दिली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी दुकानदाराला मृत घोषित केले.