मुंबई : कोट्यवधी मतदार आणि हजारो कार्यकर्ते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण जवळ आलाय. राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्याआधी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान झाले. प्रभाग रचनेच्या वादांमुळे या २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका रखडल्या होत्या. यात बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी, महाबळेश्वर, फलटण, मंगळवेढा, यवतमाळ, अंजनगाव-सूर्जी, वाशिम, घुग्घुस, देऊळगाव राजा, वर्धा, बाळापूर, बसमतनगर, मुखेड, धर्माबाद, निलंगा आणि अंबरनाथ या नगर परिषदांचा समावेश आहे. तर नेवासा, अनगर, रेणापूर आणि फुलंब्री या नगर पंचायतींसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. रविवारी एकूण २८८ नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल एकत्रित जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला २८८ नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी २ डिसेंबरला निवडणुका घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, प्रभाग रचनेवरील अपील कोर्टात प्रलंबित असल्याने २३ नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याच्या आदेशानुसार, आयोगाने उर्वरित निवडणुका २० डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी मतदान शांततेत पार पडले असले तरी काही ठिकाणी गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांच्या घटना घडल्या.
अंबरनाथमध्ये पैसे वाटप, बोगस मतदानाचा आरोप
अंबरनाथच्या प्रभाग २८ मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पैशांची पाकिटे वाटताना रंगेहाथ पकडले. हे पैसे भाजप उमेदवाराकडून वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय हजारो बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने शिवसेनेवर केला. या प्रकरणात १८८ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. मातोश्री नगर परिसरात पैसेवाटपाच्या आरोपानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार
नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात पैसे देण्याचे आमिष दाखवून डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. तर, फुलंब्री नगर पंचायतीत मतदानाच्या आदल्यारात्री मतदान केंद्राबाहेर लिंबू-मिरची आणि पिन टोचलेली बाहुली आढळली, त्यामुळे खळबळ उडाली.
गडहिंग्लज आणि कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ
कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये एम.आर. हायस्कूल मतदान केंद्रावर गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना सोडण्यावरून विरोधकांनी आक्षेप घेतला. कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. तर, कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर प्रभाव टाकल्याचे आरोप झाले.
तांत्रिक बिघाडामुळे मतदान ठप्प
वाशिमच्या प्रभाग १० मध्ये ईव्हीएम मशीन अर्धा तास बंद पडल्याने मतदान ठप्प झाले. फलटणच्या प्रभाग १३ मध्ये ईव्हीएम बटन दाबले न गेल्याने मतदान थांबवण्यात आले. दुसरे यंत्र बसवल्यानंतर प्रक्रिया सुरळीत झाली.
परळीत अवैध दारू जप्त
बीड जिल्ह्यातील परळी येथे हॉटेलजवळ पावणे तीन लाखांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.