नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक यांनी त्यांचे बंधू संजीव नाईक आणि सागर नाईक यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध बंडखोरी करून शरद पवार गटात गेलेले माजी आमदार संदीप नाईक आता पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तिकिटावर लढले होते. मात्र, भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत संदीप नाईक यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
संदीप नाईक यांच्या पुनरागमनामुळे नवी मुंबईचे प्रभावी नेते गणेश नाईक यांची ताकद कैक पटीने वाढली आहे. वडील आणि मुलाची शक्ती पुन्हा एकाच पक्षात एकवटल्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत भाजपची पकड शहरावर अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे महायुतीमधील स्थानिक समीकरणे आणि अंतर्गत स्पर्धा कशी वळण घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.