मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती; गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षांत मकोका लागणार
मुंबई : राज्यात गुटख्यावर बंदी असूनही शाळा-महाविद्यालय परिसरात त्याची विक्री सर्रास होत असल्याने सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. गुटखा उत्पादक आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणले जाणार असून, मकोका कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून येत्या नव्या वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
यापूर्वी गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधि आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार 'हार्म आणि हर्ट' या दोन्ही घटकांच्या अभावी तो लागू होऊ शकत नव्हता. त्यामुळे कायद्यात बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. हा कायदा अधिक कठोर करण्याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर काम सुरू केले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.