मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी अखेर भाजपचे 'कमळ' हाती घेतले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सातव कुटुंबाने काँग्रेसची साथ सोडल्यामुळे राज्याच्या राजकारणात, विशेषतः मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
"राजीव सातव अमर रहे"च्या घोषणा अन् आजच 'कमळ' हाती घेणार? मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते ...
बावनकुळे आणि चव्हाणांकडून स्वागत यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रज्ञा सातव यांच्यासारख्या सुशिक्षित आणि कर्तृत्ववान महिला नेत्या भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद दुपटीने वाढली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी त्या नक्कीच मोलाचे योगदान देतील." तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी "हा प्रवेश केवळ एका व्यक्तीचा नसून हिंगोलीतील एका मोठ्या जनशक्तीचा भाजपमध्ये झालेला प्रवेश आहे," अशा शब्दांत त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसमधील 'सातव' पर्वाचा अंत दिवंगत राजीव सातव हे काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील मोठे नेते होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी त्यांचा वारसा पुढे नेला. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात होत असलेल्या अंतर्गत कुरघोडी आणि दुर्लक्षामुळे त्यांनी भाजपचा रस्ता धरला. प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने हा प्रवेश सोहळा पार पडला, ज्यामध्ये हिंगोली आणि मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. निवडणुकीपूर्वी काँग्रेसची पिछेहाट आगामी निवडणुकांच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसची संपूर्ण संघटनाच आता धोक्यात आली असून, भाजपला तिथे एक सक्षम चेहरा मिळाला आहे. "पक्षात काम करताना सन्मान मिळत नसेल, तर लोकांसाठी काम करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो," अशा शब्दांत प्रज्ञा सातव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?
डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचा मराठवाड्यातील मोठा चेहरा म्हणून डॉ. प्रज्ञा सातव यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, आजच्या त्यांच्या निर्णयामुळे सातव कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले दशकांचे नाते संपुष्टात आले आहे. डॉ. प्रज्ञा सातव या केवळ राजीव सातव यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर एक सुशिक्षित आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी पक्षाने प्रज्ञा सातव यांना संधी दिली आणि त्या बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून आल्या. पहिल्या कार्यकाळानंतर पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या आमदार बनल्या. त्यांचा सध्याचा कार्यकाळ २०२४ ते २०३० असा तब्बल सहा वर्षांचा होता. मात्र, आमदारकीचे अजून ५-६ वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत होत्या. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी हिंगोली आणि मराठवाड्यात पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षांतर्गत कुरघोडी आणि गटबाजीमुळे त्या अस्वस्थ होत्या. अखेर आजच्या राजीनाम्यामुळे त्यांचा काँग्रेसमधील औपचारिक प्रवास थांबला असून, आता त्या भाजपच्या माध्यमातून नवी राजकीय इनिंग सुरू करण्यास सज्ज झाल्या आहेत.