Wednesday, December 17, 2025

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास; तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

आचारसंहिता लागू, विद्रुप झालेल्या मुंबईने घेतला मोकळा श्वास;  तब्बल २ हजार १०३ जाहिरात फलक हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुंबईत नियमबाह्य व अनधिकृतरीत्या लावण्यात आलेले एकूण २,१०३ राजकीय जाहिरात फलक, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक तसेच भिंतीवरील राजकीय जाहिराती व तत्सम साहित्य हटविण्यात आले आहे. ही कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्‍त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्‍या नेतृत्त्वाखाली आणि उप आयुक्‍त (विशेष) चंदा जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबईतील मोहीम सुरू करण्‍यात आली आहे.

अतिरिक्‍त आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्‍हणाल्‍या की, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले असून, सर्वांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने ही कारवाई करण्यात येत असून, पुढील काळातही यात सातत्य सुरू राहणार आहे.

उप आयुक्‍त (विशेष) चंदा जाधव म्‍हणाल्‍या की, मुंबईतील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत, नियमबाह्य जाहिरात फलक, फ्लेक्स आदी तत्‍सम बाबी हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ही कारवाई करताना संबंधित राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे, तसेच पुढील काळात कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल असे साहित्य लावू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्यात येत आहे.

हटवलेल्या जाहिराती

रंगवलेल्या भिंती : ०५

पोस्टर : २२०

कटआऊट होर्डींग : २६२

बॅनर : १२२३

झेंडे : २९३

एकूण : २१०३

Comments
Add Comment