उत्तर प्रदेशही शर्यतीत पुढे
मुंबई : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी ७७.९० लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४७३ कारखान्यांनी फक्त ६०.७० लाख टन साखर उत्पादन केले होते. उस गळीत हंगामाने गत दीड महिन्यात मोठी गती घेतली असून, ऊस पट्ट्यात पडलेली चांगली थंडी, कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता, तसेच तोडणी-वाहतुकीचे नियोजन या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरीत राज्यांमधील ९३ कारखान्यांनी एकूण ६.०५ लाख टन साखर तयार केली आहे.
साखर उत्पादनाची स्थिती चांगली असली तरी, कारखान्यांमधील विक्री दर सरासरी ३७ रुपये प्रति किलो राहिला आहे. साखरेच्या विक्री दरातील घसरणीमुळे कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर परिणाम झाला असून, सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, साखरेचे विक्री दर ३१ रुपयांपासून ४१ रुपयांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. इथेनॉलसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर वळविण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, "केंद्र सरकारने एफआरपी, कापणी आदींमुळे साखर उत्पादनाचा खर्च वाढल्याने थकीत रक्कम सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे."
राज्यनिहाय स्थिती अशी आहे
महाराष्ट्र : १९० कारखान्यांनी ३७९ लाख टन उसाचे गाळप करून ३१.३० लाख टन साखर उत्पादन केले आहे.
उत्तर प्रदेश : १२० कारखान्यांनी २६४ लाख टन ऊस गाळप करून २५.०५ लाख टन साखर तयार केली आहे.
कर्नाटक : ७६ कारखान्यांनी १८६ लाख टन उसाचे गाळप करून १५.५० लाख टन साखर उत्पादन केले आहे.