Tuesday, December 16, 2025

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

२९ महापालिकांवर महायुतीचाच भगवा फडकणार! - नवनाथ बन; मुंबई महापालिका निवडणूक ही एका कुटुंबाची शेवटची लढाई

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकास कामांच्या बळावर आधीच मारले आहे. मुंबईचा विकास महायुतीच करू शकते हा विश्वास मतदारांना आहे. मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा कारभार आणि गेल्या २५ वर्षांतील मुंबई महापालिकेतील कारभार पाहिलाय. उबाठा सरकारचा अडीच वर्षे घरी बसून केलेला खंडणी गोळा करण्याचा कारभार पाहिला आहे. त्यामुळे विकासासाठी मतदारांचा महायुतीलाच आशीर्वाद मिळेल आणि सर्व २९ महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी व्यक्त केला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मराठी माणसांसाठीची शेवटची लढाई आहे असे म्हणत ऊर बडवणा-यांसाठी ही मराठी माणसासाठी ची लढाई नाही तर एका कुटुंबासाठीची शेवटची लढाई आहे अशी टीकाही बन यांनी केली. ते म्हणाले, उबाठा गटाचे नाव लावून पोस्टर लावायची हिंमत नाही. आचार संहितेत पोस्टर्स लावता येत नाहीत, तेव्हा अशा अनौरस पोस्टर्सची चौकशी व्हावी, या बेनामी पोस्टर्सच्या खर्चाकडेही निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. स्वतःच्या भावाच्या मनसे पक्षाचे सात नगरसेवक फोडून त्यांचा पक्ष फोडला तेव्हा पैशांचा बाजार हा उबाठा गटाने मांडला होता याचीही आठवण बन यांनी करून दिली.

उबाठाला हिरव्या झेंड्यावरचा चांद प्रिय

हल्ली उबाठा गटाला सूर्य नाही तर त्यांना चांद जास्त प्रिय झाला आहे. हिरव्या झेंड्यावर असलेला चांद हा त्यांच्या पक्षाचा झेंडा झालेला आहे, म्हणूनच असे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे वक्तव्य ते करत आहेत. ज्या उद्योगपतींच्या घरच्या लग्नात तुमच्या लोकांनी नाचण्यामध्ये धन्यता मानली त्या उद्योगपतींबद्दल कोणत्या तोंडाने टीका करत आहात. कुठल्याही उद्योगपतीच्या घशात मुंबई जाणार नाही. मुंबई ही सर्वसामान्य नागरिकाची, सर्वसामान्य मराठी माणसाची आहे, असे बन म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >