पोलादपूरमध्ये वर्षभरात २७४ श्वानदंश रुग्ण
शैलेश पालकर
पोलादपूर : भटकी कुत्री, गुरे आणि माकडांच्या तसेच अन्य प्राण्यांच्या उपद्रवाविरोधात संबंधित प्रशासनाने ठोस कारवाई करून नागरिकांचे जीवन सुरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्ती बेंचने दिले. पोलादपूरचे कायदेतज्ज्ञ जेष्ठ नागरिक पंडीत उर्फ सुधीर चित्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा हवाला देत मोकाट कुत्री-गुरांच्या बंदोबस्तासाठी टपालाद्वारे निवेदन पाठविले. पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिपाई यांनी तहसिलदारांसह सर्व आस्थापनांना श्वानमुक्त परिसरासाठी २८ नोव्हेंबरच्या पत्राने आदेशित करून नागरिकांच्या सुरक्षेचा चेंडू अन्य आस्थापनांकडे भिरकावला. या प्रशासकीय उडवाउडवीमध्ये पोलादपूर शहरातील १४ व्यक्तींना १५ डिसेंबरपर्यंत श्वानदंश झाल्याची नोंद ग्रामीण रूग्णालयामधून प्राप्त झाली आहे.
आबालवृद्ध स्त्रीपुरूष नागरिकांना सुरक्षिततेचे जीवन तसेच वावरणे हा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्या.विक्रम नाथ, न्या.संदीप मेहता, न्या.एन.व्ही.अंजारिया या तीन न्यायाधिशांच्या बेंचने महापालिका व इतर सर्व संस्थांना निकालपत्राने आदेश दिले. या आदेशाबद्दल गांभिर्याने दखल घेऊन पोलादपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या तसेच मोकाट जनावरांच्या उपद्रवाचा त्वरीत बंदोबस्त करण्याच्या विनंतीचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी आणि पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना पोलादपूर येथील कायदेतज्ज्ञ ज्येष्ठ नागरिक सुधीर तथा पंडीत चित्रे यांनी दिले. या निकालामध्ये सर्व संबंधित संस्थांनी काय कारवाई केली याबाबत तीन महिन्यांच्या कालावधीची मुदत देऊन संबंधित संस्थाप्रमुख तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले. नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी या आदेशपत्रान्वये आस्थापनांना आदेशित करताना पोलादपूरच्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडली नसल्याची धक्कादायक आकडेवारी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये श्वानदंशावर उपचार झालेल्या रूग्णांची माहिती घेता आढळून आली आहे. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये २०२५ वर्षांमध्ये २७४ श्वानदंश रूग्णांवर उपचार करण्यात आले. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये याखेरिज उंदीर चावणे, माकडाने चावे घेणे, किटकांनी चावे घेणे, विंचू व सर्पदंशाचे रूग्ण तसेच मोकाट जनावरांच्या धडकेने जखमी झालेल्या रूग्णांचीही वेगळी आकडेवारी असल्याचे दिसून
आले आहे. पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील आबालवृध्द, स्त्री-पुरूष नागरिकांना सुरक्षिततेचे जीवन तसेच वावरणे देणे हा त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालातील मुद्दे दूर्लक्षित करून मुख्याधिकारी शिपाई यांनी नगरपंचायत हद्दीतील सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना आदेशित केल्यानंतर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी हंबीर यांनाही १ डिसेंबर २०२५ रोजी श्वानंदश झाल्याने पोलादपूर पं.स.गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी मुख्याधिकारी शिपाई यांना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पत्र दिले. यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यास २ डिसेंबर रोजी पंचायत समितीच्या आवारात श्वानदंश झाला.