नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.नवी मुंबईतील उरण परिसरात रानसाई धरणातून पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे सध्या आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे,जी डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहू शकते, जेणेकरून उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राखता येईल. मुंबईतही भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी दुरुस्तीमुळे काही भागांमध्ये पाणीकपात झाली होती, पण उरणमधील ही समस्या दीर्घकाळ चालणारी आहे.
उरणमधील रानसाई धरणाचा पाणी साठा सध्या चिंताजनक पातळीवर पोहोचला असून,तो स्थिर ठेवण्यासाठी ही कपात अपरिहार्य झाली आहे.या धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते आणि आवश्यकतेनुसार साठवणूक करता येत नाही.त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी उरणमधील रहिवाशांना पाण्यासाठी हाल करावे लागतात.त्यामुळे उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कधी होणार पाणीकपात?
या पाणीकपातीचा अवलंब दर मंगळवारी आणि शुक्रवारी करण्यात येणार आहे.जून २०२५ पर्यंत पाणी उपलब्ध राहावे, यासाठी ही संवर्धनात्मक रणनीती आखण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी पुरवठा नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.