Tuesday, December 16, 2025

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करून २२ लाख रुपये जप्त केली आहे. बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असतानाच पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्यावर कारवाई केल्याने कुटुंबाचा आर्थिक कणा मोडला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने काल (१५ डिसेंबर) बृहन्मुंबई आणि पुण्यासहसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली . ज्यात १५ जानेवारीला मतदान पार पडेल तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच निवडणूकीची घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, आचारसंहिता काळात बंडू आंदेकरच्या घरात रोकड असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्यावर त्यांनी काल सायंकाळी छापेमारी केली असता २२ लाखांची रोकड आणि बंदुक जप्त करण्यात आली.

पुण्याच्या राजकीय पटलावर आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व राहिले आहे. आंदेकर कुटुंबातील सदस्य तुरूंगात असतानाही बंडू आंदेकर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होता. त्यासाठी रोकड आणि इतर स्त्रोतांची जमवा जमव सुरू होती. याच बाबींची कुणकुण पोलिसांना लागल्यावर त्यांनी छापा टाकला.

आंदेकरांचे राजकीय वर्चस्व

आंदेकर कुटुंबातील सदस्य वत्सला आंदेकर या काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. १९९८-९९ मध्ये त्यांनी पुणे शहराचे महापौरपद भूषवले. पुण्याचे तत्कालिन कारभारी सुरेश कलमाडी यांच्यावर दबाव आणून त्यांनी महापौरपद मिळविल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. वत्सला आंदेकर यांचे पुतणे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. वनराज आंदेकर यांची सप्टेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर, आणि इतर सदस्यही नगरसेवक राहिले आहेत.

Comments
Add Comment