तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत
ठाणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढविल्या जाणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत असली तरी ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष स्बळावर निवडणूक लढणार आहे. तशी घोषणा अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना केली असून यानिमित्ताने ठाण्यात अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडल्याचे चित्र आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. या तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका महायुतीत लढविल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फारसे यश मिळाले नाही; परंतु विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश संपादन करत सत्ता स्थापन केली. असे असले तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षातील नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यांवर आले होते.
यामुळे हे तिन्ही पक्ष महायुतीत निवडणुका लढणार नाहीत आणि कार्यकर्तेही तसाच सूर लावताना दिसून येत होते. मात्र, दोन दिवसांपुर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतच निवडणुका लढण्याचे जाहीर केले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच ठाणे महापालिका निवडणुक महायुतीत लढणार असल्याचे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) हा महायुतीपासून अलिप्त असल्याचे चित्र होते.
असे असतानाच, अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिका स्बळावर निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. आम्ही महायुतीचा घटक पक्ष असून महायुतीचा एक अंग आहोत. असे असले तरी, आम्ही ठाणे महापालिका निवडणुकांबाबत भूमिका मांडली आहे की, आम्ही भाजप आणि सेनेसोबत युती करणार नाही. तशा भावना आम्ही वरिष्ठ नेत्यांना कळविल्या आहेत, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात शिंदेचा शिवसेना पक्ष भाजपला ४० ते ५० जागा सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. तसेच कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील निवडणुकीतील अपयश लक्षात घेता, मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये यासाठी विशेष रणनिती आखली जात असल्याची चर्चा होती. यातूनच कळवा-मुंब्र्यात शिवसेना आणि भाजप महायुतीत लढणार तर, अजित पवारांचा गट वेगळा लढले अशी चर्चा होती. मात्र, आता अजित पवार गटानेच स्बवळाचा नारा दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.