Monday, December 15, 2025

उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

ठाकुर्लीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू्न कारवाई

डोंबिवली  : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली, कचोरे गाव हद्दीतील रेल्वे मार्गालगत एका गोदामातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घातक रसायनांचा मोठा साठा जप्त केला आहे. या पिंपांना गळती लागल्याने हे रसायन थेट उल्हास खाडीपात्रात मिसळून प्रदूषण करीत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांना मागील आठवड्यात ठाकुर्लीजवळील कचोरे गाव हद्दीत रेल्वेमार्गालगतच्या भागात पिंपांमध्ये रसायनांचा साठा करून ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. हिरव्या जाळ्या बाजूने लावून हा साठा लपवून ठेवण्यात आला होता. या माहितीच्या आधारे अधिकारी कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी राजेश नांदगावकर यांच्या पथकाने ठाकुर्ली हद्दीत छापा टाकला. गावदेवी मंदिराच्या लगतच्या रस्त्यावर हिरव्या जाळ्या लावलेल्या एक बंदिस्त जागेत २५० पिंप आढळून आले. त्यामधील १०० पिंपामध्ये उग्र वासाचे, दुर्गंधीयुक्त घातक रसायन असल्याचे पाहणीत आढळून आले.

साठ्यातील पिंपांवर सोलापूर मोहोळ एमआयडीसी आणि भरुचा एमआयडीसीतील कंपन्यांचे पत्ते आढळले आहेत. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे का आणण्यात आला? या पिंपांमध्ये नेमक्या कोणत्या रसायनाचा साठा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात असे घातक रसायनांचे साठे निवासी विभागाजवळील परिसरात का केले जात आहेत, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

गुन्हा दाखल

काही पिंपांना गळती लागली होती, ज्यामुळे पिंपांमधील रसायन खाडीपात्रात जाऊन मिसळत होते. यामुळे खाडीचे पाणी प्रदूषित होत होते. रात्रीच्या वेळी हे पिंप खाडीपात्रात खाली केले जात असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. परिसरातील रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा साठा रणजित पांडे या व्यावसायिकाने केल्याचे उघडकीस आले. त्याने पथकाकडे साठा केल्याची कबुली दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने हा सर्व साठा सील केला असून, रणजित पांडे याच्याविरुद्ध विष्णूनगर पोलिस ठाण्यात पर्यावरण संवर्धन आणि भारतीय न्याय संहितेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment