नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. यात पाकिस्तानमधून नियंत्रित केल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दोन अतिरेकी संघटनांनाही आरोपी करण्यात आले आहे.
पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा कट आणि त्याच्या अंमलबजावणीत लष्कर-ए-तोयबा आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांची महत्त्वाची भूमिका होती. दोन्ही संघटनांच्या यंत्रणेचा कटाच्या अंमलबजावणीसाठी पुरेपूर वापर झाला होता. यामुळे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दोन अतिरेकी संघटनांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपी केले आहे.
विशिष्ट धर्माच्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनांनी पहलगाम येथे अतिरेकी हल्ला केला होता. यात नाव आणि धर्म जाणून घेऊन अनेकांची हत्या करण्यात आली. एकूण २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा अतिरेक्यांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मारल्या गेलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने हिंदू होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अतिरेकी साजिद जट्ट यालाही आरोपी केले आहे. जम्मूमधील एनआयएच्या विशेष न्यायालयात पहलगाम प्रकरणी १५९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेल्या फैसल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी या तीन अतिरेक्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. श्रीनगरच्या दाचीगाम भागात ऑपरेशन महादेव राबवून सुरक्षा दलांनी या अतिरेक्यांना ठार केले होते.
आरोपपत्रात बशीर अहमद जोथर आणि परवेझ अहमद जोथर या दोघांचीही नावे आहेत. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल एनआयएने २२ जून २०२५ रोजी या दोघांना अटक केली होती. पहलगाम हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख त्यांनी उघड केली होती. त्यांनी हे देखील सांगितले होते की, ऑपरेशन महादेव दरम्यान ठार झालेले तिन्ही अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेने भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस),शस्त्रास्त्र कायदा १९५९ आणि बेकायदा कारवायांना प्रतिबंध घालणारा कायदा १९६७ (UAPA) तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचाही गुन्हा दाखल केला आहे.
कोण आहे साजिद जट्ट ?
साजिद जट्ट हा पाकिस्तानी नागरिक आहे आणि तो पंजाब प्रांतातील कसूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. साजिद जट्टचे खरे नाव हबीबुल्लाह मलिक आहे. पण तो सैफुल्लाह, नुमी, नुमान, लंगडा, अली साजिद, उस्मान हबीब आणि शानी अशी अनेक नावांनीही ओळखला जातो. ऑक्टोबर २०२२ मध्ये, साजिद जट्टला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत (UAPA) "वैयक्तिक दहशतवादी" घोषित करण्यात आले. पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयातून साजिद सक्रीय होता. त्याने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवायांसाठी अतिरेक्यांची भरती करणे, अतिरेकी कारवायांसाठी निधीचा पुरवठा करणे, अतिरेक्यांना घुसखोरीसाठी आवश्यक ती मदत पुरवणे असे अनेक प्रकारे नियोजन केले होते.
साजिदच्या कारवायांची माहिती हाती येताच त्याच्याबाबत ठोस माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षिस भारत सरकारने जाहीर केले. यावरुन साजिदच्या कारवायांचा अंदाज येतो.
- धांगरी हत्याकांड (जानेवारी २०२३, राजौरी) – ७ नागरिक ठार, मुख्य कट रचणारा साजिद जट्ट.
- भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला (मे २०२४, पूंछ) - एक सैनिक शहीद, साजिदचा कटात सहभाग
- रियासी बस हल्ला (जून २०२४) – यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर हल्ला, साजिदचा कटात सहभाग
- पहलगाम अतिरेकी हल्ला (एप्रिल २०२५) – पर्यटकांवर हल्ला, २६ जणांचा मृत्यू; साजिदचा कटात सहभाग