कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला सुरुवात
मुंबई : नाशिक येथे २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पूजाविधी आणि पौरोहित्य क्षेत्रासाठी आवश्यक प्रशिक्षण देणारे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू होत आहेत. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून, त्याअंतर्गत २१ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा १६ डिसेंबर रोजी नाशिकच्या श्री स्वामी अखंडानंद वेद वेदांग संस्कृत महाविद्यालयात सुरू होणार आहे. कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणाऱ्या पूजाविधी, पौरोहित्य सेवा आणि धार्मिक विधींसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. २१ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात कुंभमेळ्याचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक महत्त्व, सिंहस्थ पूजन विधी, तीर्थक्षेत्रातील तप-जप व स्नान विधी, शांतीसूक्त पाठ, प्रायश्चित्त संकल्प, सकाम व निष्काम संकल्प, वेदोक्त व पुराणोक्त पूजन पद्धती, गोदावरी पूजन, दशविधी स्नान, विष्णूपूजन, गौदान आणि तर्पण विधी यांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाची रचना अशी करण्यात आली आहे की, सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विधी करताना आवश्यक असलेले शास्त्रोक्त ज्ञान आणि प्रात्यक्षिक अनुभव दोन्ही मिळतील.
कसा असेल अभ्यासक्रम?
हा अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. अभ्यासक्रम एक महिन्याचा असून, एकूण ४५ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार टप्प्यांत विभागलेल्या या अभ्यासक्रमात प्रत्येक टप्प्यास २५ गुण ठेवण्यात आले असून, साप्ताहिक तोंडी परीक्षा आणि बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे. परीक्षेतील गुण आणि उपस्थितीच्या आधारे यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
संस्कृतीला विज्ञानाची जोड - मंत्री मंगल प्रभात लोढा
या बाबत बोलतांना मंत्री लोढा म्हणाले "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकास भी, विरासत भी' या विचारांना आदर्श मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. २१ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हा त्याचाच एक भाग आहे. सनातन धर्म, भारतीय संस्कृती याला नक्कीच विज्ञानाची जोड आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून वेदपुराणातील परंपरा, त्यांचे महत्व, शास्त्रोक्त पद्धतीने देवी देवतांचे पूजन, शुद्ध उच्चार इत्यादी गोष्टींचे ज्ञान प्राप्त होईल. या ज्ञानातून त्यांच्यासाठी रोजगाराचे नवे पर्याय सुद्धा उपलब्ध होतील. वैदिक परंपरांचे शास्त्रीय ज्ञान व रोजगाराभिमुख दृष्टिकोन यांचा संगम साधणारा हा उपक्रम सांस्कृतिक परंपरेच्या जतनासोबतच कौशल्यविकासाचा प्रभावी नमुना ठरेल."