बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नीरजा यांचा कथित मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यात आले होते. पोलीस तपासात सुद्धा हेच सत्य असल्याचे सांगितले होते. मात्र नीरजाचे पती रूपेश आंबेकर यांनी हा पूर्वनियोजित खून केल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस महिला नेत्या नीरजा आंबेकर यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी हा खळबळजनक खुलासा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
नीरजा आंबेकर यांच्या हत्येतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूवेळी आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू असे भासवण्यासाठी विषारी सापाचा वापर करणे. आरोपी ऋषिकेश चाळकेने दिलेल्या जबाबानुसार, हत्या करण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि नियोजित होती. आरोपीने नीरजाच्या घरातील स्वयंपाकघरात एका पोत्यात विषारी साप आधीच लपवून ठेवला होता. यानंतर नीरजाचे पती रूपेशने पायांना मालिश करण्याच्या बहाण्याने तिला हॉलमध्ये झोपवले. सर्पप्रेमी असलेला आरोपी चेतन दुधानेने पोत्यातून साप बाहेर काढला आणि ऋषिकेश चाळकेला दिला. त्यानंतर, नीरजाला डाव्या घोट्याजवळ सापाने तीन वेळा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.
हा खून झाल्यानंतर, संपूर्ण प्रकरण नैसर्गिक मृत्यू असल्याचे घोषित करण्यात आले आणि पोलिसांनी फक्त एडीआर (अपघाती मृत्यू अहवाल) दाखल केला. तीन वर्षांनंतर, जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा पोलिसांनी नीरजा यांचा पती रूपेश आंबेकर, चेतन दुधाणे, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे मृत्युपत्र देणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
नवी मुंबई: जर तुम्ही घर खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूश खबर आहे. कारण सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या ...
प्रकरण कसे आले समोर?
काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक राजेश गज्जल हे या प्रकरणाचा तपास करत असताना, चौकशीदरम्यान ऋषिकेशला 'तू आणखी काय-काय केलं आहेस?' असा प्रश्न विचारला. तेव्हा ऋषिकेशने बोलता बोलता तीन वर्षांपूर्वीच्या एका हत्येचा खुलासा केल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला.






