कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः रेल्वे स्टेशन परिसरात होणारी कोंडी कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत नागरिकांसाठी दिलासादायक नसलेली माहिती समोर आली आहे.
नेताजी सुभाष चौक ते बैलबाजार चौक दरम्यान उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल डिसेंबर २०२५ अखेर वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा यापूर्वी महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, सध्याच्या स्थितीत ही मुदत पाळली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले असून आता या पुलासाठी मार्च २०२६ अखेरची नवी डेडलाइन देण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मल्टी लेव्हल पार्किंग प्लाझाचे काम पूर्ण होऊन ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम तसेच कल्याण एसटी डेपोचे नूतनीकरण आणि पार्किंगसंबंधी प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
स्टेशन परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ठेकेदार कंपनीला दिवसा काम करणे शक्य होत नसून रात्री १२ ते पहाटे ५ या मर्यादित वेळेतच काम करावे लागत आहे. या मर्यादांमुळे उड्डाणपुलाच्या कामाचा वेग मंदावला असून प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची वाट पाहणाऱ्या कल्याणकरांना आणखी काही महिने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.