Sunday, December 14, 2025

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा कायम राखला आहे. रविवारी दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ९० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदवला असून, उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर वैभव सूर्यवंशी (५) आणि कर्णधार आयुष म्हात्रे (३८) लवकर बाद झाले. मात्र, त्यानंतर आरोन जॉर्जने एक बाजू लावून धरली. त्याने ८८ चेंडूंत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ८५ धावांची शानदार खेळी केली. मध्यक्रमात कनिष्क चौहानने ४६ धावा (४६ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) आणि अभिज्ञान कुंडूने २२ धावा काढून संघाची धावसंख्या २०० पार नेली. भारताचा संपूर्ण संघ ४६.१ षटकांत २४० धावांवर बाद झाला आणि पाकिस्तानसमोर लक्ष ठेवले. या महत्त्वपूर्ण विजयामुळे गुणतालिकेत भारताचे स्थान मजबूत झाले आहे. पहिल्या सामन्यातही भारताने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला होता. सलग दोन विजयांसह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.

पाकिस्तानची फलंदाजी आणि भारताची गोलंदाजी

२४१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. दीपेश देवेंद्रनने भेदक गोलंदाजी करत सुरुवातीच्या फळीला झटके दिले. कनिष्क चौहानने अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीतही चमक दाखवली. हुजैफा अहसानने (७० धावा) एकाकी झुंज दिली, पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही. भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १५० धावांत गारद झाला आणि भारताने ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Comments
Add Comment