नवी दिल्ली : बिहार सरकारचे रस्ते विकास मंत्री नितीन नबीन हे भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जे. पी. नड्डा यांच्याकडून ते सूत्रं हाती घेणार आहेत. नितीन नबीन आता जे. पी. नड्डा यांची जागा घेतील. ते भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीन नबीन यांच्या संघटनात्मक अनुभवाला, तळागाळापर्यंत असलेल्या दांडग्या जनसंपर्काला आणि प्रशासकीय कौशल्य आणि क्षमतांना प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतल्या भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयातून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नितीन नबीन यांना पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. वरील नियुक्ती तात्काळ प्रभावाने अंमलात येणार असल्याचे पक्षाने प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे नवनियुक्त कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे अभिनंदन करणारे केले. नीतीन नबीन हे पक्षासाठी पूर्ण समर्पण करणाऱ्यांपैकी एक आहेत. ते एक तरुण आणि कष्टाळू नेते आहेत ज्यांना बराच संघटनात्मक अनुभव आहे. बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे काम खूप प्रभावी राहिले आहे आणि त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम केले आहे. ते त्यांच्या नम्र स्वभावासाठी आणि जमिनीवर काम करण्यासाठी ओळखले जातात; या शब्दात पंतप्रधान मोदींनी नितीन नबीन यांचे कौतुक केले.
नितीन नबीन यांची ऊर्जा आणि वचनबद्धता येणाऱ्या काळात पक्षासाठी लाभदायी ठरेल. पक्ष त्यांच्या नेतृत्वात आणखी मजबूत होईल; असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
कोण आहेत नितीन नबीन ?
बिहारमधून पाचव्यांदा आमदार झालेले नितीन नबीन हे यावेळी नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये रस्ते विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ते आमदार झाले आहेत. सरकार आणि संघटना दोन्हीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालत असलेले नितीन नबीन त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे एक लोकप्रिय नेते झाले आहेत.