कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रॅपिडो बाईक चालकाने प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून. तरुणीने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीने रॅपिडो बाईक सेवा बुक केली होती. प्रवास सुरू असताना सिंधी गेट परिसरात चालकाने बाईक बाजूला थांबवत अचानक तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे तरुणी घाबरून गेली होती.
मात्र, भीतीपोटी गप्प न बसता तरुणीने प्रसंगावधान राखत चालकाचा जोरदार प्रतिकार केला. तिने स्वतःची सुटका करत आरोपीला चांगलाच धडा शिकवला. तरुणीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि आरोपी चालकाला ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यामध्ये तरुणी आरोपी चालकाला मारहाण करताना आणि आजूबाजूला नागरिक जमा झाल्याचे दिसून येते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे उपस्थित झाला असून रॅपिडो सारख्या सेवांमधील चालकांची पार्श्वभूमी तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.