नवी दिल्ली : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन कारमध्ये एकूण ३.६० कोटी रुपये सापडले. उत्तर दिल्लीच्या वजीरपूर परिसरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, तरुण आणि आशीष नावाच्या दोन तरुणांनी कमिशनचे आमिष दाखवून या नोटा पाठवल्या होत्या. पोलीस आता या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या चार जणांची ओळख हर्ष, टेकचंद ठाकूर, लक्ष्य आणि विपिन कुमार अशी आहे. चौकशीत त्यांनी हे नोटांचे बंडल नोएड्यातील तरुण आणि आशीष नावाच्या दोन व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. पोलीस आता या दोघांच्या शोधात आहे. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी लोकांना कमी किमतीत जुन्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखवले होते. 'आधार कार्ड दाखवले तर आरबीआय या नोटा पुन्हा बदलून देईल, असे ते सांगत होते. २०१६ नंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याचे सर्वांना माहीत असूनही या टोळीने लोकांची दिशाभूल केल्याचे डीसीपी भीष्म सिंह यांनी सांगितले. आरोपी २०२१ पासून अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेले होते.