विरार : महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिका प्रशासन निवडणूक कामाच्या तयारीला लागले आहे. मतदान केंद्र तयार करणे, मतपेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी करण्यासाठी जागेची निवड आदी कामाचा आढावा आयुक्तांकडून नियमित घेतल्या
जात आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात २९ प्रभाग येतात. २८ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ नगरसेवक यावेळी निवडून द्यावयाचे आहेत. तर २९ व्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. निवडणुकीच्या आनुषंगाने आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
तसेच सुरक्षा व्यवस्था, स्ट्राँग रूमची ताकद, सीसीटीव्ही पाळत ठेवणे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था, उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह सर्व महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, दीपक सावंत, उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सुरेंद्र ठाकरे, अमोल जाधव, उपअभियंता सतीशकुमार सूर्यवंशी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणी एकाच ठिकाणी होणार
वसई-विरार महापालिका निवडणुकीची मोजणी यापूर्वी प्रभागनिहाय म्हणजेच ९ ठिकाणी केली जात होती. मात्र मतमोजणीच्या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता यावी तसेच पोलीस यंत्रणा आणि निवडणूक कर्मचारी यांना नियोजनबद्ध पद्धतीने काम करता यावे म्हणून यावेळी एकाच ठिकाणी मतमोजणी करण्याचा पालिकेचे नियोजन आहे. महापालिकेच्या मुख्यालय इमारतीमधील पार्किंगमध्ये सर्व ११५ जागांची मतमोजणी केली जाण्याची शक्यता आहे.