मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने काही अहवाल अद्याप उपलब्ध झाले नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवालांशिवाय कोणताही आदेश देता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले.
मालाड येथील एका उच्चभ्रू सोसायटीतल्या उंचावरील एका मजल्यावरुन पडल्यामुळे दिशाचा ८ जून २०२० रोजी मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद पोलिसांनी केली होती. तपासात हाती आलेल्या इतर माहितीवरुन पोलिसांनी नंतर दिशाने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली होती. पण दिशा प्रकरणाशी संबंधित काही अहवाल अद्याप आलेले नाही. या प्रकरणी न्यायालयाने नाराजी व्यक्त करत दिशाचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल करून गंभीर आरोप केले. दिशावर सामूहिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गुन्हा तात्काळ नोंदवावा, तपास सीबीआयकडे द्यावा, काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रकरण झाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत… असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांनी दिशा प्रकरणाशी संबंधित सर्व वैद्यकीय अहवाल न्यायालया सादर करण्याचे निर्देश दिले.






