पुनर्विकास करण्यात येणाऱ्या शालेय इमारतींसाठी महापालिकेने उचलले असे पाऊल
मुंबई : माहिममधील महापालिका शाळा धोकादायक होत असल्याने दुसऱ्या परिसरांत स्थलांतरीत केल्या जात असल्याने जोरदार टिका होत असतानाच आता महापालिकेने पुनर्विकास केल्या जाणाऱ्या जागेवरच तात्पुरती शाळेची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. शीव कोळीवाडा येथील हेमंत मांजरेकर रोडवरील सरदार नगर महानगरपालिका शालेय इमारत जुनी झाल्याने यांच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे. यासाठी या शालेय इमारतीच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात वर्ग खोल्या तथा शाळा कार्यालय यासाठी लोखंडी पोर्टेबल कॅबिन तथा कंटेनरची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे आता नवीन शाळेच्या बांधकामाच्या ठिकाणी कंटेनरमध्ये पोर्टेबल कॅबिनमध्येच शाळा भरवून मुलांना लांबचा शाळेत पायपीट करायला न लावण्याचा निर्धार केला आहे.
शीव कोळीवाडा येथील सरदार नगरमध्ये महापालिकेची तळमजला अधिक तीन मजल्याची इमारत आहे. ही इमारत ४७ वर्षे जुनी असून या शालेय इमारतीचे बांधकाम ४,०१७ चौ. मीटर अर्थात ४३,२३८ चौ. फूटाच्या जागेवर आहे. ही इमारत ४७ वर्षापेक्षा जास्त जुनी असल्याने या शाळेचे बांधकामाचे ऑडीट करण्यात आहे, या ऑडीट अहवालानुसारशालेय इमारत सी-२-ए प्रवर्गात मोडत असल्याचे आढळून आले. पण शालेय इमारत दुरुस्तीचा खर्च बांधकाम खर्चाच्या ५३.४९ टक्के एवढा होणार असल्याने याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शालेय इमारतीचे बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका शालेय इमारती धोकादायक झाल्याने त्या बंद करून त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याने मुलांना इतर शाळांमध्ये स्थलांतरीत करावे लागत आहे. त्यामुळे मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता शिक्षण विभागाकडून तात्पुरत्य स्वरुपाच्या वर्ग खोल्यांची तथा संक्रमण शिबिराची मागणी करण्यात आली. त्यानुसार या विदयार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये याकरिता शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाच्या वर्ग खोल्यांची तथा संक्रमण शिबिर बांधले जाणार आहे.
त्यामुळे पोर्टा केबीन च्या स्वरुपात ०८ वर्गखोल्या व १ कर्मचारी खोली, स्वतंत्र शौचालये व प्लास्टीकच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या पोर्टा केबिन मधील मोकळ्या जागेत ६० मि.मी. पेव्हर ब्लॉकच्या ३ मीटर रुंद चालण्याचा मार्ग, पदपथ, शौचालयांवर जी.आय. शीटचे छप्पर, संरचनात्मक व्यवस्थेसह ओव्हरहेड प्लास्टिक पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच नळ जोडणी, विद्यमान मलनिःसारण वाहिनी लाईन आणि प्रस्तावित शौचालयाची मलनिःसारण लाईनची जोडणीही असेल. यासाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च केला जाणार असून यासाठी एमआर एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.






