केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप
फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान !
नवी दिल्ली : नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा व्होट चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. सरदार पटेल यांना बहुसंख्यांची पसंती असतानाही फक्त दोन मते मिळून नेहरू पंतप्रधान झाले होते, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत केला.
शहा यांनी लोकसभेत निवडणूक सुधार प्रक्रियेवर सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांतील नेते गेल्या काही काळापासून व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. या मुद्द्यावर शहा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी व्होट चोरी म्हणजे काय? आणि नेहरू-गांधींच्या काळात तीन वेळा व्होट चोरी झाल्याचा प्रसंग सविस्तर सांगितला.
व्होट चोरी म्हणजे काय? तर त्याचे तीन प्रकार आहेत. एक तर मतदार नसतानाही जर कुणी मतदान करत असेल, तर त्याला व्होट चोरी म्हटले जाते. दुसरे, चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यास आणि तिसऱ्या जनादेश बाजूला ठेवून जर पद ग्रहण केल्यास त्याला व्होट चोरी म्हटले पाहिजे. स्वातंत्र्यानंतर तीन वेळा व्होट चोरी झाली. सर्वात आधी स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान निवडायचा होता. त्यासाठी मतदान कोण करणार होते? तर त्यावेळी काँग्रेसचे जितके प्रांताध्यक्ष होते, त्यांच्या मतानंतर पंतप्रधान ठरणार होता. त्यावेळी २८ मत सरदार पटेल यांना मिळाली, तर फक्त दोन मते नेहरूंना मिळाले. तरीही पंतप्रधान नेहरू बनले,
असे ते म्हणाले.
इंदिरा गांधींनी अनैतिक पद्धतीने निवडणूक जिंकली
पुढे शहा म्हणाले की, “इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली. विरोधी उमेदवार राजनारायण हे अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी निवडणुकीला आव्हान दिले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल देताना निवडणुकीत अनियमितता झाल्याचे मान्य केले. हीदेखील एक मोठी व्होट चोरी होती.”ही व्होट चोरी झाकण्यासाठी त्यानंतर संसदेत कायदा आणला की, पंतप्रधानांवर कोणताही खटला दाखल होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला इम्युनिटी दिल्याचा मुद्दा राहुल गांधी उपस्थित करतात. पण इंदिरा गांधींनी जी इम्युनिटी घेतली होती, त्यावर त्यांचे म्हणणे काय आहे? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
सोनिया गांधींच्या काळात तिसरी व्होट चोरी
सोनिया गांधी यांच्या काळात तिसरी व्होट चोरी झाल्याचे ते म्हणाले. योग्यता नसतानाही मतदार झाल्याचा प्रकार त्यांच्या काळात झाला. सोनिया गांधी या देशाच्या नागरिक होण्यापूर्वी मतदार बनल्या होत्या, याबद्दलचा वाद दिल्ली न्यायालयात पोहोचला आहे, असे त्यांनी सांगितले.