Thursday, December 11, 2025

रविंद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

रविंद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आगामी डावपेचांबाबत चर्चा झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतल्या इतर घटक पक्षांसोबत कशा प्रकारे समन्वय राखायचा या संदर्भात रविंद्र चव्हाण आणि अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. संघटनात्मक नियोजनासाठी अमित शाह यांनी रविंद्र चव्हाणांना मोलाचे मार्गदर्शन केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अलिकडेच चर्चा झाली. समन्वयाबाबत काही निर्णय झाले. या निर्णयांची माहिती देणे आणि पुढील नियोजनासाठी मार्गदर्शन घेणे या हेतूनेच रविंद्र चव्हाणांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. भेट सकारात्मक वातावरणात झाली.

राज्यात २ डिसेंबर रोजी एकूण २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यानंतर राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आणि जानेवारी २०२६ मध्ये राज्यातल्या २९ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व होणार असलेल्या निवडणुकांकरिता डावपेच आखण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >