नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा विचारही करत आहे. पासपोर्ट निलंबित झाला अथवा रद्द झाला तर संबंधित व्यक्ती परदेशात प्रवास करू शकत नाही. परदेशात असेल तर पासपोर्ट रद्द झाल्यास संबंधित व्यक्तीला अटक करुन तातडीने मायदेशी पाठवले जाण्याची शक्यता असते.
गोव्यातील प्रसिद्ध बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लब आगीच्या घटनेत पोलिसांची कारवाई सातत्याने तीव्र होत आहे. गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. या प्रकरणातील नवीन माहिती अशी आहे की सीबीआय किंवा गोवा पोलिसांकडे लुथरा बंधूंबद्दल कोणतीही ताजी माहिती नाही. लुथरा बंधू थायलंडमध्ये आहेत की इतरत्र पळून गेले आहेत याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती नाही.
गोवा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी, कॅफेचा सह-मालक अजय गुप्ता याला दिल्लीहून ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे. पोलीस पथक त्याला थेट अंजुना पोलिस ठाण्यात घेऊन गेले,जिथे त्याची सविस्तर चौकशी केली जात आहे.
३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड
दिल्लीच्या साकेत न्यायालयाने १० डिसेंबर रोजी अजय गुप्ता याचा गोवा पोलिसांना ३६ तासांचा ट्रान्झिट रिमांड दिला. या आदेशानंतर आरोपीला दिल्लीहून गोव्यात आणण्यात आले.अजय गुप्ता हा क्लबच्या मालकी रचनेत लुथ्रा बंधूंचा भागीदार असल्याचे म्हटले जाते आणि गुंतवणुकीपासून ते कामकाजापर्यंत त्याची भूमिका पोलिस तपासाच्या केंद्रस्थानी आहे.