कंट्रोल चार्टद्वारे मतदार यादीची केली जाते पडताळणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या ११ हजार ४९७ तक्रारींपैंकी आतापर्यंत १० हजार ६६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतची मतदार यादी गुरुवारी किंवा शुक्रवारी आयोगाला सादर करण्यात येणार आहे. मतदाराचे नाव राहत्या मतदार केंद्रात नसणे, बाजुच्या मतदार केंद्रात किंवा प्रभागात असणे अशाप्रकारच्या चुका दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला आहे. या तक्रारींचे निवारण प्रत्यक्ष स्थळी पाठवून याची खातरजमा केली जात असल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी आणि उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी पत्रकारांशी बोलतांना ही आकडेवारी दिली आहे. प्रभागात वास्तव्य असताना दुसऱ्या प्रभागात किंवा परिसरात नाव असल्यास किंवा मतदारांची नावे समाविष्ठ नसणे तसेच नावात चुका अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. एकूण ११,४९७ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातील १० हजार ६६८ तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक विभागाने यावर निर्णय घेण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी म्हणून विभागाच्या सहायक अायुक्तांना दिले होते.त्यानुसार २६ विभागाच्या सहायक आयुक्तांनी यावर निर्णय घेतला आहे.
यावर निर्णय घेतल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांना यामध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांनी सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांना याची पुनर्चाेकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कंट्रोल चार्ट नुसार पाहणी केली जात आहे. आता कंट्रोल चार्टनुसार १५ डिसेंबरपर्यंत तपासणी केली जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार केंद्रनिहाय मतदार यादी ही २७ डिसेंबरपर्यंत बनवली जाणार आहे.
कंट्रोल चार्टनुसार कशी होणार तपासणी
मुंबईतील अनेक वस्त्या घनदाट असल्याने झोपडपट्टीतील वस्ती, इमारती, सोसायटी तसचे प्रभाग सिमारेषा आदींची सांगड घालून हे कंट्रोल चार्ट तपासले जाते. मुदत वाढल्याने याची खात्री करायला अजुन अवधी मिळाला आहे,असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.
दुबार मतदारांची संख्या १५ टक्क्यांपर्यंत राहील
प्रारुप मतदार यादीतील हरकती व सूचनांवर प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये ८२९ या दुबार मतदारांसंदर्भात होत्या. मात्र, एकूण १ लाख १ हजार दुबार मतदारांपैंकी विभाग स्तरावर यादीची पडताळणी करून शोध घेतल्यानंतर केवळ २ लाख २५ हजार मतदार हे दुबार आढळून आले होते. त्यातील ५० टक्के दुबार मतदारांची पडताळणी झाली आहे. यामध्ये खरे दुबार ४१ हजार०५७ आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या दुबार मतदारांची टक्केवारी १८.२ टक्के असला तरी उर्वरीत दुबार मतदारांची पडताळणी सुरु आहे. या अंतिम पडताळणीनंतर खऱ्या दुबार मतदारांची टक्केवारी १५ टक्के एवढी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुबार मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न गृहभेटीद्वारे केले जात आहे. मतदार नसल्यास बिएलओ आपला मोबाईल क्रमांक तिथे सोडून येतो,तसेच तेथील गुगल लोकेशन कार्यालयाला कळवतो.